आमदार संजय शिरसाट यांच्यावर मुंबईत ॲन्जिओप्लास्टी, प्रकृती धोक्याबाहेर
By बापू सोळुंके | Updated: October 18, 2022 19:05 IST2022-10-18T19:00:00+5:302022-10-18T19:05:08+5:30
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेत एअरॲम्ब्युलन्स पाठवली, त्यानंतर आमदार संजय शिरसाट यांना अधिक उपचारासाठी मुंबईत आणण्यात आले.

आमदार संजय शिरसाट यांच्यावर मुंबईत ॲन्जिओप्लास्टी, प्रकृती धोक्याबाहेर
औरंगाबाद : बाळासाहेबांची शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराची लक्षणे दिसत असल्याने आज सकाळी ८ वाजता त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले होते. आज सायंकाळी ४. ३५ वाजता लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या आ. शिरसाट यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. आ. शिरसाट सोमवार सायंकाळपासून औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात रक्तदाब वाढल्याने उपचार घेत होते. मात्र, रक्तदाब नियंत्रित होत नसल्याने त्यांना मुंबईला अधिक उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेत एअरॲम्ब्युलन्स पाठवली. यातून आ. संजय शिरसाट यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉ. नितीन गोखले आणि डॉ. पारकर यांच्या टीमने लागलीच त्यांच्या तपासण्या सुरु केल्या. प्रथम त्यांची ँअँजिओग्राफी तपासणी करण्यात आली. यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या एका रक्तवाहिनीत ब्लॉकेज असल्याचे समोर आले. त्यानंतर लागलीच हृदयविकारतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले यांनी त्यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. सायंकाळी ४.२५ वाजता स्टेंट टाकून रक्तवाहिनीतील अडथळा दूर केल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली. शिरसाट यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा सिद्धांत शिरसाट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी रुग्णालयात आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व मुंबईला हलविण्याचा निर्णय
आ. शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोअर गटातील आमदार आहेत. शिरसाट यांची प्रकृती खालावल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना दोनवेळा फोन करून माहिती घेतली. यानंतर शिरसाट यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय त्यांनी घेत एअरॲम्ब्युलन्स पाठविली. मुख्यमंत्री मुंबईतील लीलावती डॉक्टरांच्याही संपर्कात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.