अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:04 IST2021-04-19T04:04:36+5:302021-04-19T04:04:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडोद बाजार : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील ...

A minor girl was abducted and tortured | अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार

अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क

वडोद बाजार : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील खामगावात घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र वाघ (२२, रा. नायगव्हाण) याच्याविरुद्ध वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर आरोपी रवींद्र वाघ व पीडित मुलीला पोलिसांनी सुरत (गुजरात) येथून ताब्यात घेतले आहे.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ जानेवारी २०२१ रोजी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. त्यामुळे मी नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु ती सापडली नाही. शोधाशोध करताना समजले की, तिला रवींद्र दत्तू वाघ याने फूस लावून पळवून नेले आहे. त्यानंतर याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शरद पवार यांनी तपास सुरू केला. यावेळी तपास करत असताना पोलीस पथकाला संशयित आरोपी सुरत येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सुरत गाठून मुलीसह व रवींद्र वाघ याला ताब्यात घेतले. याप्रकरणी रवींद्र वाघ (२२, रा. नायगव्हाण) याच्याविरुद्ध वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Web Title: A minor girl was abducted and tortured