छत्रपती संभाजीनगर : छावणी पोलिसांनी १६ वर्षीय पीडितेवर सामूहिक अत्याचार प्रकरणात ‘हेतुपुरस्सर’ सोडून दिलेल्या चार मुख्य संशयितांपैकी तीन आरोपींना अखेर विशेष पथकाने निष्पन्न करून अटक केली. पीडितेने सांगूनही छावणी ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी आणि तपास अधिकाऱ्यांनी त्यांचा एफआयआर किंवा दोषारोपपत्रात आरोपी म्हणून समावेशच केला नव्हता. ‘लोकमत’ने याबाबत सखोल वृत्तमालिकाच प्रसिद्ध करून हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आणले होते.
सप्टेंबर २०२४ मध्ये या मुलीवर नाशिक, धुळ्यात अत्याचार करण्यात आले. पीडितेने तिला अमली पदार्थ देऊन पाच जणांकडून अत्याचार झाल्याचे छावणी पोलिसांना वारंवार सांगितले. मात्र, छावणी पोलिसांनी जयश्री सोनवणे (रा.संगमनेर, अहिल्यानगर), जयपाल प्रकाश गिरासे (३५, रा.शिरपूर, जि.धुळे) यांना आरोपी करत अटक केली. मात्र, इतरांना हेतुपुरस्सर आरोपी केले नाही, शिवाय पॉक्सो कायद्यास ॲट्रॉसिटी कायद्याच्या नियमांना डावलून तिचा जबाब नोंदविला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या गुन्ह्याची ‘फाइल रिओपन’ करून नव्याने तपास करण्याचे आदेश दिले होते.
अखेर तिघे अटकेत, एक पसारपोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी नव्याने तपास सुरू केल्यावर जयपालसोबत मोहम्मद एजाज अब्दुल हफिज शेख (३८, रा.सूरत, गुजरात), हरिओम उर्फ हर्ष मनोज राठोड (२५), हाजी उर्फ इस्माईल शमशोद्दीन अन्सारी (४२, दोघे रा.मध्य प्रदेश) व शिवनाथ योगी (रा.नागौर, राजस्थान) यांचीही नावे निष्पन्न झाली. पथकाने दोन आठवडे तपास करत, यातला एजाज, हरिओम व हाजी उर्फ इस्माईलला अटक केली. शिवनाथ अद्यापही पसार आहे. बब्बू उर्फ जमील शहा (रा.मध्य प्रदेश) याचा घटनेनंतर धक्कादायकरीत्या मृत्यू झाला.
कनिष्ठांवरच कारवाईचा बडगाया घटनेत तपासात कसूर केल्याचा ठपका ठेवत, केवळ उपनिरीक्षक सोपान नरळे यांनाच निलंबित करण्यात आले. मात्र, तपासात हस्तक्षेपाचा अधिकार असलेल्या तत्कालीन अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त झाले. पॉक्सोच्या तपासात वरिष्ठांची भूमिका महत्त्वाची असते. नियमाने पॉक्सो गुन्ह्याच्या दोषारोपपत्राची वरिष्ठ समितीमार्फत छाननी होते. अत्याचाराच्या या गुन्ह्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष का केले, वरिष्ठांनी यात लक्ष का घातले नाही, तपासात चुका निदर्शनास का आणून दिल्या नाहीत, हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहेत.