अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
By Admin | Updated: June 27, 2014 00:10 IST2014-06-26T23:11:26+5:302014-06-27T00:10:23+5:30
प्रताप नलावडे , बीड आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या.

अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
प्रताप नलावडे , बीड
आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईटस् पाहत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेअर करीत असल्याचेही सांगितले. ही धक्कादायक माहिती, ‘लोकमत’ ने जिल्ह्यात केलल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजालात अल्पवयीनांचे बाल्यमन हरवत असल्याचे सिद्ध झाले आहे.
‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. यात जिल्ह्यातील ११ तालुक्यात १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात १० ते १४ वर्षे वयोगटातील १५२, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३३६ व १९ वर्षांवरील १२ जणांचा समावेश होता. यात १९२ मुली व ३०८ मुलांना सहभागी करण्यात आले. १९८ मुला- मुलींनी वयाच्या १० वर्षांपासून, तर ३०२ जणांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून मोबाईल, इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली. ६७ टक्के मुला- मुलींनी सांगितले की, त्यांना ओळखीच्या व काहीवेळा अनोळखी व्यक्तीकडून अश्लील एसएमएस, एमएमएस प्राप्त झाले आहेत. ७४ टक्के इंटरनेटचा वापर गाणे, गेम, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी करीत आहेत. ५५ टक्के म्हणाले की, शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहोत, तर ६० टक्के चॅटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यातही ७७.६ टक्के मुले- मुली सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करीत आहेत. धक्कदायक बाब म्हणजे यातील ६६.२ टक्के मुला- मुलींना अश्लील फोटो, व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले ते त्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींनाही पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांनी पोर्न वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. ४२.२ टक्के अल्पवयीन दररोज नियमितपणे इंटरनेटचा वापर करीत आहेत. बहुतांश जण आपल्या पालकांच्या अनुपस्थितीत इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले.
सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई- वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैन थांबत नाही.
पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हातळावा अशी सक्ती करा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. आपल्या मुलांच्या हाती मोबाईल, इंटरनेट दिल्यावर ते त्याचा उपयोग कोणत्या कामासाठी करतात याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
इंटरनेट अॅडिक्शन
मानसिक आजारात आता ‘इंटरनेट अॅडिक्शन’चा नव्याने समावेश झाला आहे. प्रौढांप्रमाणेच अल्पवयीन मुलेही इंटरनेटच्या अतिआहारी जात आहेत. यातून पोर्न व्हिडिओ पाहणे, ते पाठविणे, तसेच वेळ मिळेल तेव्हा चॅटिंग करणे, त्याशिवाय बेचैन होणे, अशी लक्षणे दिसून येतात. मोबाईलमुळे इंटरनेटचा वापर एवढा सोपा झाला आहे की, लहान मुलेही सहजपणे ते हाताळत आहेत. इंटरनेटपासून रोखणे कठीण आहे. त्याच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव पालकांनी आपल्या पाल्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लैंगिक शिक्षण देणे आवश्यक झाले आहे.
-डॉ. संजय जानवळे, बालरोग तज्ज्ञ, बीड
इंटरनेट वापराचा अतिरेक
स्मार्ट फोन हातात नसला की, ही मुले अस्वस्थ होतात. टच स्क्रीन फोन तर त्यांना अधिक अधीर बनवत आहे. टॉयलेटमध्ये जातानाही अनेक मुले स्मार्ट फोन सोबत घेऊन जातात, एवढा अतिरेक स्मार्ट फोनचा झाला आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडे होत असलेले दुर्लक्ष हेच यास कारणीभूत ठरत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात कोणत्या वयात स्मार्ट फोन द्यावा, हे ठरवावे. स्मार्ट फोन घेऊन दिला तर इंटरनेटवर मुलगा काय करतो, यावरही जातीने सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दिवसातून एकदातरी त्यांनी मुलांचा मोबाईल तपासावा. पालकाचे लक्ष असले तर धाकाने मुले अश्लील फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करून घेणार नाहीत.
-प्राचार्य डॉ. वसंत सानप,
बलभीम महाविद्यालय, बीड
असे केले सर्वेक्षण
सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय तज्ज्ञ, प्रतिष्ठीत व्यक्ती, अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व्हे एप्रिल-मे २०१४ दरम्यान जिल्ह्यातील आकरा तालुक्यात करण्यात आला. ‘लोकमत’ चमुने हा सर्व्हे केला. आकरा तालुक्यातील १० ते १९ वर्षे वयोगटातील ५०० मुला- मुलींशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी थेट संपर्क साधून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका भरून घेतल्या. सर्व्हे झाल्यानंतर वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हेक्षणाची सारणी, विश्लेषण, शोध आणि शेवटी निष्कर्ष काढण्यात आला. सर्व्हेक्षण केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली.