राज्यमंत्री देशमुखांसाठी आहे मनोहर तरी...

By Admin | Updated: June 16, 2014 01:15 IST2014-06-16T00:41:11+5:302014-06-16T01:15:56+5:30

दत्ता थोरे , लातूर लातूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री अमित देशमुख यांच्यापुढे विरोधी पक्षातून सध्या तरी समर्थ विरोधक नाही.

Minister of State for Deshmukh Manohar ... | राज्यमंत्री देशमुखांसाठी आहे मनोहर तरी...

राज्यमंत्री देशमुखांसाठी आहे मनोहर तरी...

दत्ता थोरे , लातूर
लातूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री अमित देशमुख यांच्यापुढे विरोधी पक्षातून सध्या तरी समर्थ विरोधक नाही. त्यामुळे लातूर शहरमधून ‘सबकुछ अमित देशमुख’ असेच चित्र आहे. परंतु निवडणुका येईपर्यंत काही काँग्रेसमधल्याच इच्छुकांचे पक्षांतराचे ‘मतलबी’ वारे वाहिले तर मात्र अमित देशमुख यांची डोकेदुखी वाढू शकते. विरोधी पक्षापेक्षा पक्षातील विरोधकांना सोबत घेण्याचे वा त्यांचे पक्षांतर रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
दिवंगत विलासरावांचा राजकीय वारस म्हणून अमित यांची गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आमदारकी’च्या रुपाने प्रतिष्ठापणा झाली. काँग्रेसचा आणि विलासरावांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात कायमच देशमुखांचा वरचष्मा राहिला आहे. अपवाद फक्त ९५ ला शिवाजीराव कव्हेकर पाटील यांच्या रुपाने फिरलेल्या ‘चक्रा’चा होता. त्यानंतर पुन्हा जी लातूरवर देशमुखांनी मांड ठोकली ती आजतागायत शाबूत आहे. लातुरात साहेबांची पुण्याई अनेकांसाठी लाभदायक ठरली. राज्यमंत्री अमित तर गढीच्या रक्ताचे आणि विलासरावांचे वारस. विलासरावांच्या निधनानंतर ते स्वत:च्या पहिल्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या सोबतीला राजकारणातला अर्क असलेले काका आ. दिलीपराव देशमुख यांचे कवचकुंडलं आहेतच.
लोकसभेला दत्तात्रय बनसोडे गुरुजींसाठी ते एकदा सामोरे गेले होते. मात्र सपशेल अपयश आले. लोकसभेतील सारी गणिते विधानसभेला लागू होतातच असे नाही. महायुतीच्या वाट्यात ही जागा सेनेची. पण सेनेच्या भात्यात चांगला ‘बाण’ नाही. पत्रकापुरते अस्तित्व असलेल्या सेनेकडे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी एकमेव नाणे आहे, पण त्याला खणखणाट नाही. सेनेचे मनपात सहा मेंबर, पण विधानसभेच्या दृष्टीने एकही टोकदार नाही. खुद्द जिल्हाप्रमुखांना दोन विधानसभेसह नगरपरिषदेतही पराभव झेलावे लागले. उडती खबर अशी आहे की औशातून दोन वेळा लढलेल्या प्राचार्य सूर्यभान जाधव यांनी मातोश्रीवरून आशीर्वाद आणलेत. मनपात एकही सदस्य नसलेल्या भाजपाला लातूर शहरातही मोदी लाटेवर विधानसभेला विजयाचे मखर चढवायची स्वप्ने पडत आहेत. परंतु पक्षातल्या इच्छुकांपेक्षा काँग्रेसमधील शैलेश लाहोटी या तरुण चेहऱ्याला भाजपात खेचायच्या जोरदार हालचाली चालू आहेत. लाहोटी हे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपात जाणार अशा वावडीची वावटळ गेल्या दोन महिन्यांपासून लातूरमध्ये भिरभिरते आहे. त्याला लाहोटी खरेही म्हणीत नाहीत आणि खोटेही नाही. पण आमदार होण्याची त्यांच्या मनातील इच्छा लपून राहिली नाही. शिवाय त्यांची लोकप्रियताही मोठी आहे. भाजपाकडे म्हणाल तर शहरात निलेश ठक्कर हा जुना एक चेहरा आहे. पण मुन्सिपालिटीत यांचाही एकदा पु. ल. देशपांडेंच्या कथेतल्यासारखा अण्णू गोगटे झालेला. तेव्हांपासून स्वत:ची क्षमता बाजूला ठेवून ते विजनवासातच आहेत.
९५ च्या चमत्काराचे धनी असलेल्या शिवाजीराव पाटील कव्हेकरांसह आता जवळपास सर्व सक्रीय पक्ष झाले आहेत. काँग्रेसमध्ये देशमुखांचे ते पक्षांतर्गत विरोधक म्हणून परिचित आहेत. शहर आणि ग्रामीण अशा दोघांपैकी एक मतदारसंघ मिळावा, ही त्यांची मनिषा आहे. लोकसभेच्या पराभवानंतर या दोनच मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांनी पराभवाची कारणमीमांसा केली. त्यांना नाकारणे काँग्रेसला बंडखोरीला निमंत्रण देण्यासारखे आहे.
गेली ४० वर्षे काँग्रेसमध्ये असलेल्या चाकूरकर गटाचा कसलाच पत्ता अद्याप ओपन नाही. एकाची झाकली मूठ आणि दुसऱ्याचा ओपन ‘पंजा’ या साऱ्यांना राज्यमंत्री अमित हे कसा शह देतात यावर त्यांची वाटचाल आहे. लातूर शहरात महाराष्ट्र विकास आघाडीचे अ‍ॅड. अण्णाराव पाटील हे कायम आपला लढाऊ बाणा दाखवित आले आहेत. तत्वाची आणि सत्वाची लढाई घेऊन अ‍ॅड. पाटील यंदाही रिंगणात येण्याची शक्यता दाट आहे.
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते...
काँग्रेसअमित देशमुख ११३००६
बसपाखय्युमखान पठाण २३५२६
शिवसेनाश्रीपाद कुलकर्णी १९९०५
इच्छुकांचे नाव पक्ष
शिवाजीराव पाटील काँग्रेस
अ‍ॅड़ अण्णाराव पाटील मविआ
शैैलेश लाहोटी - श्रीपाद (पप्पू) कुलकर्णी शिवसेना

Web Title: Minister of State for Deshmukh Manohar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.