सामाजिक न्याय खात्याला ७ हजार कोटींचा निधी कमी मिळाल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज
By बापू सोळुंके | Updated: March 15, 2025 19:36 IST2025-03-15T19:35:43+5:302025-03-15T19:36:28+5:30
लाडकी बहिणसाठी ४ हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेस १५०० कोटी तर ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी निधी वर्ग केला.

सामाजिक न्याय खात्याला ७ हजार कोटींचा निधी कमी मिळाल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज
छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहिण योजना चांगलीच आहे. त्यासाठी पैसे दिले पाहिजे, यात दुमत नाही. पण सामाजिक न्याय व आदिवासी विभागाला राज्यघटनेच्या तरतुदीनुसार निधी दिला पाहिजे, यात कट मारता येत नाही, असे असताना लाडकी बहिण योजनेसाठी ४ हजार कोटी तर पंतप्रधान आवास ला १५०० कोटी आणि ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी असे एकूण सात हजार कोटी देण्यात आले. याचा फटका सामाजिक न्याय विभागाला बसला, अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली.
सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधाला. ते म्हणाले की, आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय हे विभाग मागास लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहेत. या खात्याला घटनेच्या तरतुदी नुसार निधी द्यावा लागतात. यात कट मारता येत नाही. लाडकी बहिणसाठी ४ हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेस १५०० कोटी तर ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी दिल्याने आपल्या खात्याला एकूण ७ हजार कोटींचा फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले.
बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधले असता शिरसाट म्हणाले की, बीडमध्ये घडणाऱ्या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. गुंडगिरी संपविण्याचे काम महायुती करीत आहे. बीडमध्ये गुंडांना त्यांची जागा दाखविली जाईल, असे संपर्कमंत्री म्हणून ग्वाही देत असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमावर संतोष देशमुख प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी आणि न्यायाधिश एकत्र रंग खेळताना जो फोटो दाखवला तो गांभीर्याने घेण्यासारखा आहे. फोटो सत्य असेल तर सरकारने कारवाई केली पाहजे,असे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील पाणी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे ते म्हणाले. या प्रश्नांवर मराठवाड्यातील पक्षाचे आमदार यासाठी सरकारकडे बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगजेबाची कबर येथे कशाला?
औरंगजेबची कबर काढण्यासाठी दम लागतो, असे संजय राऊत म्हणाले, याकडे लक्ष वेधले असता, शिरसाट म्हणाले की, कुणाचा दम काढता? अडीच वर्ष तुम्ही गोट्या खेळत होता का? पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता का? असा सवाल करीत आमच्या छत्रपती संभाजीराजेंना त्रास देणाऱ्यांची कबर येथे कशाला पाहिजे, ही कबर उखडून फेकायला हवी,अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.