पैठण : तालुक्यातील पाचोड ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे.
पाचोड ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या रोहयोच्या कामावर कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांची नावे भरून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असल्याने मोठी खळबळ उडाली होती. लोकमतमधून या गंभीर प्रकारावर उजेड टाकल्यानंतर राज्यभर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. यानंतर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली. यांनतर आज जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी पाचोड येथील रोजगार हमी योजनेच्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रोहयो उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी करण्यासंदर्भात पत्र दिले असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण....राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे गाव व त्यांचे पुतणे सरपंच असलेल्या पाचोड ग्रामपंचायत अंतर्गत बीड बायपास ते साजेगाव हा रस्ता रोहयो योजनेत करण्यात आला. या कामावर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या धनदांडग्यांची नावे खतवून त्यांच्या नावावर पेमेंट काढण्यात आले असल्याचे मस्टर व कोविड अहवालानुसार समोर आले होते. पैठण तालुक्यात मजुरासाठी रोहयो अंतर्गत कोट्यवधी रूपयाचे कामे मंजुर करण्यात आले आहेत. मात्र, कामांवर मजुरांच्या ऐवजी धनदांडगे, व्यापारी, वकील, कारखान्याचे माजी एम डी, निमशासकीय कर्मचारी, टँक्स भरणाऱ्या प्रतिष्ठितांच्या नावांची नोंद असल्याचे पुढे आले.