एमआयएमचा वंचितकडे ८० जागांचा प्रस्ताव; औरंगाबादमधील तिन्ही जागांवर दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:47 IST2019-08-09T15:27:31+5:302019-08-09T15:47:56+5:30
औरंगाबाद मध्य, पूर्व, पश्चिम मतदारसंघ लढवणार

एमआयएमचा वंचितकडे ८० जागांचा प्रस्ताव; औरंगाबादमधील तिन्ही जागांवर दावा
औरंगाबाद : २०१४ साली एमआयएमने विधानसभेच्या २४ जागा लढविल्या होत्या. यावेळी तेवढ्या जागा एमआयएम लढवीलच. त्यात औरंगाबादच्या तीन जागांचाही समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पूर्व, मध्य आणि पश्चिमवर एमआयएमचा दावा राहील, असे आज येथे औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, एमआयएमने शंभर जागा हव्या अशी मागणी केली. आता आम्ही ८० जागांचा प्रस्ताव ठेवलाय. कारण गेल्या पाच वर्षांपासून एमआयएमकडे अगदी मराठा, ब्राह्मणांपासून इतरही समाजघटकांचा ओढा वाढलाय. हे जरी असले तरी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी चर्चा सुरू ठेवून इतक्या इतक्या जागांवर तुम्ही लढू शकता, असे म्हणून वाट मोकळी करून दिली तर आम्ही तयारीला लागू. नव्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी तीनऐवजी चार दिवसांची मुदत शंकरराव लिंगे, महेंद्र लिंगे व सुभाष तनकर यांचा समावेश असलेल्या समितीला देण्यात आलेली आहे.
मुस्लिम मते मौलवीच्या हातात आहेत, या आंबेडकर यांच्या ताज्या विधानाकडे लक्ष वेधले असता जलील म्हणाले, काँग्रेसधार्जिणे मौलवी काँग्रेसच्या बाजूने असू शकतात. परंतु आता मुस्लिम समाजालाही हे लक्षात येत आहे की, तीन तलाक आणि कलम ३७० हटविण्याच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही संसदेत आवाज उठविला नाही. त्यांनी सभात्याग करणे पसंत केले.
ईव्हीएम हटेल,तर हे सरकार हटेल https://t.co/WqQ8hcTcI3
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 9, 2019
सुमित कोठारी आणि जसवंतसिंह हे दोघेही विमानसेवांच्या संदर्भात चांगला पाठपुरावा करीत आहेत. औरंगाबादहून विमानसेवेसाठी एअर लाईन्सची पूर्ण तयारी होत आली आहे. इंडिगोचीही तयारी आहे, पण पावसामुळे थोडासा परिणाम झाला आहे, असे सांगून लोकसभेत आवाज उठविण्याने प्रश्न मार्गी लागतात, याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. रेल्वे प्रश्नांवर आवाज उठविल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्यांना पाठविलेले पत्रच यावेळी दाखविले. यावेळी अरुण बोर्डे, गंगाधर ढगे, नासेर सिद्दीकी, शेख अहमद आदींची उपस्थिती होती.
‘स्थानिक स्वराज्य’चा निर्णय लवकरच
बुधवारी दिल्लीहून आल्यानंतर एमआयएमच्या सर्व नगरसेवकांसमवेत माझी बैठक झाली. त्यात त्यांनी सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत मतदान कुणाला करायचे हे ठरविण्याचा अधिकार मला दिला. मी पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करीन. तसे तर दोन्ही उमेदवार आमच्या दृष्टीने योग्य नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.