विहिरीत लाखोंचा घोटाळा; शाखा अभियंता निलंबित
By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-15T23:59:30+5:302014-07-16T01:24:35+5:30
बीड : राष्ट्रीय पेयजल योजनेत १३ लाख रुपयांचा अपहार करणे बीड उपविभागातील शाखा अभियंता एम़ डी़ भदेवाड यांना चांगलेच भोवले आहे़

विहिरीत लाखोंचा घोटाळा; शाखा अभियंता निलंबित
बीड : राष्ट्रीय पेयजल योजनेत १३ लाख रुपयांचा अपहार करणे बीड उपविभागातील शाखा अभियंता एम़ डी़ भदेवाड यांना चांगलेच भोवले आहे़ मंगळवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश निघाले असून जुन्याच विहिरीला नवी विहीर दाखवल्याचा ठपका आहे़
तांडा सुधार योजनेंतर्गत २०११- १२ मध्ये राष्ट्रीय पेयजलमधून बीड तालुक्यातील भवानवाडी, मुंडे वस्ती येथे ५७ लाख ५५ हजार रुपये निधीची विहीर मंजूर झाली होती़ या योजनेसाठी ३५ लाख २९ हजार रुपये निधी वर्गही झाला होता़ तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी ७ नोव्हेंंबर १०१३ रोजी सदरील गावात भेट दिली तेव्हा जुन्याच विहिरीला नवीन विहीर दाखवून १२ लाख ९६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले़ त्यानंतर भामरे यांनी भदेवाड यांच्याकडे खुलासा मागविला होता; पण त्यांनी मुदतीत उत्तर दिले नाही़ शिवाय असामाधानकारक उत्तर दिले़ त्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सीईओ जवळेकर यांच्यापुढे ठेवला होता़ जि़प़ सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील नियम ३ च्या तरतुदीचा भंग केल्याचा ठपका ठेवून त्यांना तडकाफडकी निलंबित केले़ निलंबन काळात आष्टी उपविभाग हे मुख्यालय राहील़ (प्रतिनिधी)
वीस दिवसानंतर मुहूर्त!
बीड उपविभागाचे शाखा अभियंता एम़ डी़ भदेवाड यांनी केलेल्या प्रतापानंतर त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वीस दिवसांपूर्वीच ठेवला होता; पण निलंबन आदेशावर स्वाक्षरी झाली नाही़ अखेर भदेवाड यांच्या निलंबन आदेशाला मुहूर्त मिळाला़ त्यामुळे योजनांमध्ये अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच हादरा बसला आहे़