कोट्यवधींच्या रस्त्यात उभे आहेत लाखो रुपयांचे खांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:05 IST2021-07-16T04:05:52+5:302021-07-16T04:05:52+5:30
खोडा : महापालिका आणि महावितरणमध्ये चार वर्षांपासून टोलवाटोलवी औरंगाबाद : महापालिकेने शहरात कोट्यवधी रुपयांचे रस्ते शासनाच्या निधीतून बांधले आहेत; ...

कोट्यवधींच्या रस्त्यात उभे आहेत लाखो रुपयांचे खांब
खोडा : महापालिका आणि महावितरणमध्ये चार वर्षांपासून टोलवाटोलवी
औरंगाबाद : महापालिकेने शहरात कोट्यवधी रुपयांचे रस्ते शासनाच्या निधीतून बांधले आहेत; परंतु त्या रस्त्यात अजूनही लाखो रुपये किमतीचे महावितरण कंपनीचे वीजपुरवठा करणारे खांब उभे आहेत. चार वर्षांपासून ते खांब महावितरण काढत नाही आणि इकडे पालिकादेखील पाठपुरावा करण्यासाठी परिश्रम घेत नाही. परिणामी, रस्त्यात उभे असलेले ते खांब अपघात आणि अतिक्रमणांना आमंत्रण देत आहेत.
गुळगुळीत झालेल्या रस्त्यांवर खांबांचे अडथळे कायम आहेत. ते खांब हटविण्यासाठी पालिकेने चार वर्षांपूर्वी महावितरण कंपनीला पैसे भरले आहेत; पण वीज कंपनी या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत आहे.
२०११ मध्ये रस्ते रुंदीकरण मोहीम राबविली. डांबरी आणि सिमेंट काँक्रिटीकरणातून रस्ते झाले, विजेचे खांब अजूनही तसेच आहेत. शासनाच्या निधीतून ३० ते ३५ रस्त्यांची कामे करण्यात आली. या सर्व रस्त्यांवर विजेचे खांब न काढता कामे पूर्ण करण्यात आली.
खांब हटविण्यासाठी वीज कंपनीने पालिकेला कोट्यवधी रुपयांची मागणी केली. पालिकेने टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची तयारी दर्शविली. कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले, अद्याप या रस्त्यावरील विजेचे खांब, रोहित्र महावितरने पैसे घेऊनही काढलेले नाहीत. असाच प्रकार जयभवानीनगर ते शिवाजीनगर, जानकी हॉटेल ते मेहरसिंग कॉलेज रोड, एपीआय कॉर्नर ते एमआयडीसी चिकलठाणा रोड येथेही आहे. रस्ते गुळगुळीत होऊनही खांबांचे अडथळे कायम आहेत. हे खांब काढण्यासाठी टीव्ही सेंटर येथे शॉपिंग कॉम्प्लेक्सला डीटीसीच्या उभारणीसाठी २४ लाख २० हजार २१५ रुपये भरूनही पुढे काही झाले नाही.
पावणेचार कोटी भरल्याचा दावा
संस्थान गणपती ते जिन्सी सबस्टेशन रोडमधील खांब काढण्यासाठी अंदाजे १ कोटी ७६ लाख, कैलासनगर स्मशानभूमी ते एमजीएम हॉस्पिटल रोडसाठी १ कोटी ४० लाख, रोशन गेट येथील लाइन शिफ्ट करण्यासाठी २४ लाख, शिवाजीनगर, गारखेड्यांतर्गत लाइन शिफ्ट करण्यासाठी १२ लाख, समर्थनगर, हायकोर्ट कॉलनी, सातारा आमदार रोडसाठी २७ लाख, तर मेहरसिंग नाईक ते एमराल्डसिटीसाठी ५ लाख रुपये भरल्याचा दावा सूत्रांनी केला.