ढाब्यावर लाखोंचा गुटखा जप्त
By Admin | Updated: January 15, 2017 01:06 IST2017-01-15T01:04:54+5:302017-01-15T01:06:58+5:30
तुळजापूर : शहरानजीक सोलापूर रोडवरील चंद्रलोक ढाब्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी शनिवारी दुपारी विशेष पथकासह कारवाई केली़

ढाब्यावर लाखोंचा गुटखा जप्त
तुळजापूर : शहरानजीक सोलापूर रोडवरील चंद्रलोक ढाब्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी शनिवारी दुपारी विशेष पथकासह कारवाई केली़ या कारवाईत लाखो रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातलेली असतानाही अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शहरासह जिल्हाभरात गुटखाविक्री तेजीत सुरू आहे़
तुळजापूर शहरानजीकच्या सोलापूर मार्गावरील चंद्रलोक ढाब्यावर गुटख्याचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीवरून दस्तुरखुद्द सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी पोना शिवाजी सिरसाट, दीपक नाईकवाडी, शाम छत्रे आदींच्या पथकासमवेत शनिवारी दुपारी धडक कारवाई केली़ या कारवाईवेळी ढाब्यावर लाखो रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़ पोलिसांनी कारवाईची माहिती दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तुळजापूर पोलीस ठाण्यात धावून गेले़ कारवाईला सहा तासाहून अधिकचा वेळ लोटला तरी अधिकाऱ्यांना गुटख्याचा ताळमेळ लागत नसल्याचे सांगत होते़
राज्य शासनाने राज्यात गुटखा विक्रीस बंदी घातली आहे़ मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरित्या गुटखाविक्री करणाऱ्यांकडे साफ डोळेझाक केली आहे़ नव्हे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या आजू-बाजूलाही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखाविक्री होत आहे़ असे असतानाही केवळ पोलीस अधिकाऱ्यांनी धाड मारल्यानंतरच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पंचनामा करून गुटख्याची होळी करण्याचे काम करीत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून शहरासह जिल्हाभरात दिसून येत आहे़
दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी धडक कारवाई करून मुद्देमाल जप्त केला असला तरी किती रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी देऊ शकले नाहीत़ परिणामी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती़ (वार्ताहर)