लाखो गणेशमूर्र्तींचा संगम; भाविक सज्ज
By Admin | Updated: September 16, 2015 12:03 IST2015-09-14T23:55:25+5:302015-09-16T12:03:01+5:30
औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर स्थानिकच नव्हे, तर अकोला, अमरावती, नाशिक व नगर जिल्ह्यांतून लाखभर गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत

लाखो गणेशमूर्र्तींचा संगम; भाविक सज्ज
औरंगाबाद : औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर स्थानिकच नव्हे, तर अकोला, अमरावती, नाशिक व नगर जिल्ह्यांतून लाखभर गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. २५ मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींचा संगम एकाच ठिकाणी झाल्याने गणेश भक्त प्रत्येक स्टॉलवर फिरून गणरायाची अनंतरूपे आपल्या डोळ्यात साठवून घेत आहेत.
जिल्हा परिषद मैदानात मागील १४ वर्षांपासून गणेशोत्सवाआधी मूर्ती विक्रीचा बाजार भरत असतो. यंदा ५१ विक्रेत्यांनी येथे स्टॉल मांडले आहेत. याशिवाय ७ मूर्तिकारांनीही येथे मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यंदा परजिल्ह्यांतूनही लहान व मध्यम आकारांतील १ लाख मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवात मूर्तिकार नवनवीन रूपांत गणरायाला घडवीत असतात. यंदा बॉक्स आॅफिसवर सर्व विक्रम मोडणाऱ्या ‘बाहुबली’ चित्रपट व टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’च्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशमूर्ती बाजारात आणल्या गेल्या आहेत. यात उजव्या खांद्यावर शंकराची पिंड घेतलेली बाहुबली गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. चंद्रकोर असलेली आडवी पगडी धारण केलेली ‘जय मल्हार’ मूर्तीही सर्वांच्या पसंतीस पडत आहे. याशिवाय मनमोहक रूप असलेली बालगणेशाची मूर्तीही आबालवृद्धांना आकर्षित करीत आहे. लालबागचा राजाची मूर्तीही यंदा लहान आकारात उपलब्ध झाली आहे. तसेच पुण्यातील कसबा गणपती, मुंबईतील सिद्धिविनायकही येथे बघण्यास मिळत आहे. याव्यतिरिक्त साईबाबांच्या रूपातली गणेशमूर्तीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळच्या गणेशमूर्तींमध्ये अजून एक नवीन बदल पाहावयास मिळला तो म्हणजे मूर्तीसाठी वापरले जाणारे धोतराचे कापड हे वेल्वेटचे असून, ते वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मूर्तीला एक वेगळीच चमक आली आहे. मात्र, अशा मूर्तींकडे केवळ एक आकर्षण म्हणूनच गणेशभक्त पाहतात. घरगुती पूजेसाठी आजही लोक पारंपरिक लहान मूर्तीलाच प्राधान्य देतात तसेच शास्त्रोक्त पद्धतीनुसार मूर्ती ही शक्यतो पाटावर किंवा चौरंगावर बसलेली व हातात ‘पाश’, अंकुश’ धारण केलेली असावी. यात ‘दगडूशेठ’, ‘मध्यम चौरंग, ‘म्हैसूर’, ‘पेशवा गणपती’, ‘नक्षी’, ‘सात्त्विक गणेश’, ‘वैभव गणेश’ या मूर्तींना पूजेसाठी जास्त मागणी असते. ९ ते ११ इंच उंचीच्या गणेशमूर्तीलाच जास्त पसंती असते.