लकी ड्रॉच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

By Admin | Updated: August 6, 2015 01:03 IST2015-08-06T00:28:44+5:302015-08-06T01:03:01+5:30

औरंगाबाद : लकी ड्रॉमध्ये भाग्यवंताला डस्टर कार देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या टोळीला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली.

Millions of frauds in the name of Lucky Draw | लकी ड्रॉच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

लकी ड्रॉच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक


औरंगाबाद : लकी ड्रॉमध्ये भाग्यवंताला डस्टर कार देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या टोळीला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. या टोळीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
निवृत्ती ऊर्फ बालाजी बकाल, बद्री बकाल, योगेश काळे, कृष्णा म्हस्के, विष्णू शिंदे, धर्मा अभंग आणि अशोक जाधव, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींचा साथीदार योगेश मानकापे फरार झाला आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मराठवाड्यात लकी ड्रॉ सोडतीच्या नावाखाली सभासदांकडून लाखो रुपये जमा करून त्यांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा खुलेआम सुरू होता. लकी ड्रॉ सोडत योजनेला शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने अशा योजना राबविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली होती. त्यामुळे अशा योजना राबविण्याचे धाडस कोणीही करीत नव्हते. असे असताना चिकलठाणा येथील काही जणांनी एक लकी ड्रॉ योजनेचे पत्रक वाटून सभासद नोंदणी सुरू केली. प्रत्येक सभासदांकडून चार हजार रुपये जमा केले जात. नोंदणीकृत सर्व सभासदांना चारपट रकमेच्या बक्षिसाची हमी देण्यात आली. ५९९९ सभासद करण्याचे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले होते. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.
एजंटांना देत होते कमिशन
योजनेत जास्तीत जास्त सभासदांनी नोंदणी करावी, यासाठी आरोपींनी विश्वासातील व्यक्तींना कमिशन तत्त्वावर एजंट म्हणून नेमले होते. प्रतिसभासद त्यांना ३०० रुपये कमिशन ते देत होते. दरम्यान, या योजनेत सभासद होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.
एकरकमी रक्कम घेत
या योजनेत सभासद होण्यासाठी एकरकमी अकरा हजार रुपये भरा अथवा प्रतिआठवडा चारशे रुपये याप्रमाणे अकरा महिने रक्कम जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली. दर आठवड्याला ते सोडत काढत असत.

Web Title: Millions of frauds in the name of Lucky Draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.