पुजाऱ्यांच्या कन्यांसाठी लक्षाधीश योजना
By Admin | Updated: April 25, 2016 23:30 IST2016-04-25T23:20:51+5:302016-04-25T23:30:01+5:30
तुळजापूर : शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पुजाऱ्यांना कन्यारत्न होताच त्या मुलींसाठी लक्षाधीश योजना राबविण्याचा पुजारी मंडळाचा मानस असल्याची माहिती अध्यक्ष सज्जन साळुंके यांनी दिली़

पुजाऱ्यांच्या कन्यांसाठी लक्षाधीश योजना
तुळजापूर : शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पुजाऱ्यांना कन्यारत्न होताच त्या मुलींसाठी लक्षाधीश योजना राबविण्याचा पुजारी मंडळाचा मानस असल्याची माहिती अध्यक्ष सज्जन साळुंके यांनी दिली़ शिवाय विविध विषय मार्गी लावण्यासाठी तीन वर्किंग कमिटीची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही साळुंके यांनी यावेळी दिली़
श्री तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाच्या नवीन संचालक व सभासदांची सोमवारी अध्यक्ष सज्जन साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली़ यावेळी संचालक अविनाश गंगणे यांनी तुळजाभवानी मंदिरात स्थानिक महिलांना ओळखपत्रावर थेट दर्शन मिळावे, यासाठी मंडळाने पुढाकार घ्यावा, अशी माणी केली़ काही संचालकांनी बोगस पुजारी, मंदिरातील शिस्त, टोळोबा दरवाजा भाविकांसाठी खुला करावा यासह इतर विषय उपस्थित केले़ या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली़ तर नूतन संचालक मंडळ अतिथींच्या सत्कारासाठी होणारा खर्च, चहापानावर होणारा खर्च स्वत: करणार असल्याचे साळुंके यांनी यावेळी सांगितले़ तर काही संचालकांनी गरीब पुजाऱ्यांसाठी पुजारी मंडळाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी लावून धरली़ या मागणीनंतर अध्यक्ष साळुंके यांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या पुजाऱ्यांच्या घरी कन्यारत्न होताच त्यांच्यासाठी लक्षाधीश ही योजना राबवू, असे सांगितले़ या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले़
यावेळी सचिव प्रा़ काकासाहेब शिंदे यांनी मागील वार्षिक अहवाल वाचन केला़ तसेच न्यायालयीन प्रकरणांची जबाबदारी प्रा़ धनंजय लोंढे यांच्याकडे, मंदिरातील जबाबदारी अविनाश गंगणे यांच्याकडे तर नरेश अमृतराव यांच्याकडे प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली़ शेवटी उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले़
बैठकीस नरसिंग बोधले, विकास खपले, भारत कदम, सुधीर रोचकरी, अजय हंगरगेकर, कल्याण भोसले, बाबा क्षीरसागर यांच्यासह संचालक, पुजारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (वार्ताहर)