गुजरातच्या कारचा मध्यरात्री थरार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:14 IST2018-01-01T00:14:11+5:302018-01-01T00:14:15+5:30
गुजरात पासिंग नंबर असलेल्या संशयित कारचा मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग सुरू केला अन्.. त्या कारमधून गोळीबाराचा आवाज पोलिसांच्या कानी पडला.

गुजरातच्या कारचा मध्यरात्री थरार...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गुजरात पासिंग नंबर असलेल्या संशयित कारचा मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग सुरू केला अन्.. त्या कारमधून गोळीबाराचा आवाज पोलिसांच्या कानी पडला. मात्र, पाठलाग करणाºया पोलीस अधिकारी, कर्मचाºयांपैकी कोणाकडेही शस्त्र नसल्याने ते थबकले आणि समोरचे वाहन सुसाट निघून गेले. अलर्ट झालेल्या पोलिसांनी कार आणि त्यात बसलेल्या माणसांना शोधून काढले. मात्र, ना त्यांच्याकडे शस्त्र सापडले, ना त्यांनी गोळीबार केल्याचा कोणताही पुरावा... हा थरार रात्री दीड ते साडेचार वाजेपर्यंत सुरू होता.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहर पोलिसांना डोळ्यात तेल घालून गस्त करण्याचे आदेश दिले. वेदांतनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास जिल्हा कोर्ट, क्रांतीनगर मार्गे कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकातून पुढे जात होते. त्यावेळी गुजरातच्या नंबरची समोरचे मडगर तुटलेली कार रेल्वेस्टेशनकडे सुसाट जात असल्याची दिसली. या संशयित कारचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला. एका मोठ्या हॉटेलपासून पुढे असताना समोर दोन रिक्षा आणि अन्य एक कार रस्त्यावर पाहून त्या कारचालकाने जोरात ब्रेक लावले. यावेळी कारमधून गोळीबार झाल्याचा आवाज गस्तीवरील पोलिसांच्या कानावर पडला. यानंतर पोलीस थबकले. कारण पाठलाग करणाºया एकाही पोलिसाकडे शस्त्र नव्हते. त्यानंतर ती कार पुढे रेल्वेस्टेशन येथे गेली. कारमधील चार जण उतरले आणि रिक्षाने घाटीकडे गेले. घाटी परिसरात दोन जण, तर टाऊन हॉल येथे दोन जण रिक्षातून उतरले. तर कारचालक कारसह रेल्वेस्टेशन परिसरात गेला. यानंतर नियंत्रण कक्षातून अलर्ट मिळताच अधिकारी, कर्मचाºयांनी त्या कारचा शोध सुरू केला. शेवटी कार आणि त्यातील माणसांना शोधले असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग केल्याचे त्यांना माहीत नाही. ना त्यांनी गोळीबार केला, ना त्यांच्या घरझडतीत शस्त्रे सापडली.