नजीर शेख, औरंगाबाद
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याबरोबरच कंपन्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी शहरालगत असणाऱ्या विविध औद्योगिक वसाहतींमध्ये ‘मिनी स्टेडियम’ असावे, असा विचार राष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू राहिलेले आणि आंतरराष्ट्रीय पंच डॉ. मकरंद जोशी यांनी मांडला आहे.
‘माझ्या शहरात काय हवे?’यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, क्रीडा सुविधा दिल्यास कंपन्यांची उत्पादकता वाढण्यास मदतच होत असल्याचे आपण पाहिले आहे. शरीर आणि मन सुदृढ असेल तर कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. झपाट्याने वाढणाऱ्या आपल्या औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिकांचे स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे. औद्योगिकरण, भौतिक सुविधांची वाढ यामुळे पर्यावरणावर आणि पर्यायाने माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी औरंगाबादकरांना क्रीडा सुविधांची आवश्यकता आहे. शहरात विविध संस्था व शासनामार्फत तयार केलेली स्टेडियम आहेत. साई क्रीडा केंद्र, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, आमखास मैदान, विभागीय क्रीडा संकुल, गरवारे स्टेडियम, महानगरपालिकेची कम्युनिटी सेंटर्स, शाळा, महाविद्यालयांची मैदाने, विद्यापीठाचे मैदान आणि क्रीडा सुविधा, शहरात विविध ठिकाणी असलेले महानगरपालिकेचे बॅडमिंटन हॉल, अशा सुविधा आहेत. मात्र, औद्योगिक शहर म्हणून वेगाने पुढे येणाऱ्या आपल्या शहरालगतच्या औद्योगिक वसाहतींमधील अधिकारी, कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी अशी सुविधा नाही. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांना स्वत:च्या स्वास्थ्यासाठी, आरोग्य जपण्यासाठी सुविधा नाहीत.
माझ्या मते, प्रत्येक औद्योगिक वसाहतीत ‘मिनी स्टेडियम’असावे. या स्टेडियममध्ये आवश्यक असणारी मैदाने आणि क्रीडा साहित्य असावे. यामध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस, छोटी जलतरण तालिका, जीम, योगा हॉल, एरोबिक्स, आदी सुविधा असायला हव्यात.
केवळ या सुविधा करून प्रश्न सुटणार नाहीत, तर यासाठी या औद्योगिक वसाहतींमधील प्रत्येक कंपनीतील कामगार- कर्मचाऱ्यांसाठी अर्ध्या तासाचे नियोजन (शेड्यूल) असावे. या अर्ध्या तासात प्रत्येकाने या स्टेडियममध्ये येऊन २० मिनिटे आवडीचा खेळ खेळावा, व्यायाम करावा. त्यानंतर दहा मिनिटांत वॉश घेऊन आपापल्या कंपनीत जावे. मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये स्टेडियमपर्यंत येण्या-जाण्यासाठी काही
कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मात्र, नियोजन करून वेळ ठेवता येतो. कंपन्यांमध्ये शिफ्टनिहायही वेळ ठेवता येऊ शकते. या स्टेडियमची कंपन्यांनी सामूहिक देखभाल करावी. तसेच तेथील ट्रेनरच्या वेतनाचा भारही सामूहिकपणे उचलावा.
खेळ आणि व्यायाम हा ‘ट्रेस’ (तणाव) कमी करण्याचा भाग आहे. ट्रेस कमी असेल तर काम उत्साहात होईल. यामुळे कंपन्यांची ‘प्रॉडक्टिव्हिटी’ वाढेल आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षरीत्या कंपन्यांनाच होणार आहे.
अशीच योजना औरंगाबाद शहरातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही हवी. मी खेळाच्या निमित्ताने चीन आणि हंगेरी या देशांत गेलेलो असताना तेथे अशा प्रकारे औद्योगिक वसाहतींमध्ये ‘मिनी क्रीडा स्टेडियम’ पाहिले आहेत. अशी सुविधा आपल्याकडेही निर्माण करता येऊ शकते.
स्पोर्टस् मेडिसीन सायन्स सेंटर हवे
आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्या शहरात असायला हवी असे मला वाटते. ती म्हणजे ‘स्पोर्टस् मेडिसीन सायन्स सेंटर’. औरंगाबाद शहरातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. परंतु त्यांना आशियाई, राष्ट्रकुल किंवा आॅलिम्पिक स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करायचे असल्यास कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे आणि यासाठी शहरात ‘स्पोर्टस् मेडिसीन सायन्स सेंटर असण्याची नितांत आवश्यकता आहे. या सेंटरमुळे खेळाडूंच्या इजा, दुखापतींवर योग्य उपचार मिळतील, त्यामुळे खेळाडू पुढील काळात स्पर्धेत टिकून राहील. खेळाडूंना इजा होऊ नये म्हणून सुविधा उपलब्ध होतील. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली सराव करता येईल. या सेंटरची खेळाडूंना तांत्रिक तयारीसाठी खूप मदत मिळेल. शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी ‘मूव्हमेंट अॅनालिसिस’ (हालचालींचे विश्लेषण) या सेंटरमधून करता येते. ज्याद्वारे खेळाडू त्यांच्या तंत्रामध्ये सुधारणा करू शकतील आणि कौशल्य उंचावू शकतील. तंदुरुस्तीची अनेक अद्ययावत उपकरणे या सेंटरमधून त्यांना मिळू शकतील. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील व औरंगाबाद शहराची नवी ओळख निर्माण होण्यासही मदत होईल.
एमआयडीसींमध्ये ‘मिनी स्टेडियम’ असावे
By admin | Updated: August 15, 2014 01:13 IST
नजीर शेख, औरंगाबाद शहरालगत औद्योगिक वसाहतींमध्ये ‘मिनी स्टेडियम’ असावे, असा विचार राष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू राहिलेले आणि आंतरराष्ट्रीय पंच डॉ. मकरंद जोशी यांनी मांडला आहे.
एमआयडीसींमध्ये ‘मिनी स्टेडियम’ असावे
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}