Thalapathy Vijay: नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते थलापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने अभुतपूर्व यश मिळवले. अनेक दशकांपासून द्रविडियन राजकारण करणाऱ्या DMK आणि AIDMK ला धूळ चारत, TVK चे १०८ आमदार निवडून आले. या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाने ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग स्वीकारल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने नव्याने निवडून आलेल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांना महाबलीपुरममधील खासगी लक्झरी रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
TVK ला १०८ जागांवर विजय
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाने दमदार कामगिरी करत २३४ पैकी १०८ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ११८ जागांच्या बहुमतापासून पक्ष काही जागांनी दूर आहे. यामुळे संभाव्य घोडेबाजार, दबाव किंवा आमदारांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी विजय यांनी आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.
महाबलीपुरममधील लक्झरी रिसॉर्टमध्ये आमदार
मीडिया रिपोर्टनुसार, विजय यांनी आपल्या बहुतांश आमदारांना पूंजेरी येथील ‘फोर पॉइंट स्टार’ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह खासगी सुरक्षा व्यवस्थाही येथे तैनात करण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही आमदार बाहेरील संपर्कात येऊ नये.
एका रात्रीचे भाडे किती?
हॉटेलच्या वेबसाइटनुसार येथे विविध प्रकारचे लक्झरी रूम्स आणि व्हिला उपलब्ध आहेत. ८ मे ते ९ मे या कालावधीतील एका रात्रीचे अंदाजे भाडे पुढीलप्रमाणे आहे :
गार्डन व्ह्यू किंग बेड रूम : ₹१४,२५० ते ₹१५,०००
ट्विन/सिंगल बेड गेस्ट रूम : ₹१४,२५० ते ₹१५,०००
बाल्कनीसह गेस्ट रूम : ₹१४,२५० ते ₹१५,०००
गार्डन व्ह्यू व्हिला : ₹१६,६२५ ते ₹१७,५००
पूल व्ह्यू व्हिला : ₹१७,५७५ ते ₹१८,५००
यामुळे विजय यांच्या राजकीय हालचालींनी राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
काय असते ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’?
निवडणुकीनंतर बहुमत अपुरे असताना किंवा सरकार स्थापनेदरम्यान आमदार फुटण्याची भीती निर्माण होते. अशावेळी पक्ष आपल्या आमदारांना एखाद्या सुरक्षित रिसॉर्ट, हॉटेल किंवा लक्झरी व्हिलामध्ये ठेवतो. यालाच ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ म्हटले जाते.
यामागचा उद्देश म्हणजे विरोधी पक्षांपासून आमदारांना दूर ठेवणे आणि पक्षातील एकजूट कायम राखणे. अनेकदा राज्यसभा निवडणुका, अविश्वास प्रस्ताव किंवा सत्तासंघर्षाच्या काळात अशा प्रकारच्या रणनीतीचा वापर केला जातो.
तमिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय?
थलपती विजय यांच्या पक्षाने पहिल्याच मोठ्या निवडणुकीत प्रभावी कामगिरी केली आहे. मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पुढील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. विजय यांची ही रणनीती सरकार स्थापनेसाठी निर्णायक ठरते का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Thalapathy Vijay's TVK won 108 seats in Tamil Nadu elections. To prevent poaching, MLAs are in a Mahabalipuram resort costing ₹14,250-₹18,500 nightly. This 'resort politics' sparks political intrigue.
Web Summary : थलपति विजय की TVK ने तमिलनाडु चुनाव में 108 सीटें जीतीं। दलबदल रोकने के लिए, विधायकों को महाबलीपुरम के एक रिसॉर्ट में रखा गया है, जिसका प्रति रात खर्च ₹14,250-₹18,500 है। इस 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' से राजनीतिक उत्सुकता बढ़ गई है।