दोन कोटी ८० लाख रुपयांचा निधी एमआयडीसीने द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:53+5:302021-01-08T04:07:53+5:30
औरंगाबाद : एपीआय कॉर्नर जालना रोड ते प्रोझॉन मॉल मार्गे कलाग्राम या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. ...

दोन कोटी ८० लाख रुपयांचा निधी एमआयडीसीने द्यावा
औरंगाबाद : एपीआय कॉर्नर जालना रोड ते प्रोझॉन मॉल मार्गे कलाग्राम या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. २७०० मीटर लांबी आणि ३० मीटर रुंदीचा हा रस्ता असून, त्या रस्त्यात येणाऱ्या महावितरणच्या डी.पी., विद्युत खांब हटविण्यासाठी लागणारा दोन कोटी ८० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी एमआयडीसीने उपलब्ध करून द्यावा, असे पत्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एमआयडीसीला दिले आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त असताना त्यांनी एमआयडीसीमार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. पाहणी करताना त्यांना रस्त्याच्या कामाची गुणवत्ता आणि मॉलच्या पुढे रस्त्याची रुंदी १२ वरून ९ मीटर करण्यात आल्याचे लक्षात आले. रस्त्यातील विद्युत यंत्रणा स्थलांतरित करण्यासाठी येणारा खर्च अंदाजपत्रकात नसल्यामुळे कंत्राटदाराने रुंदीकरणाऐवजी जेवढा रस्ता आहे, तेवढा करण्याचा निर्णय घेतला होता. ही बाब जिल्हाधिकारी चव्हाण यांनी एमआयडीसीच्या कानावर घालण्यासाठी पत्र दिले.
त्या रस्त्याच्या कामाचा तपशील असा
मूळ कंत्राटदार : लक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स, पाचोरा, जळगाव
सध्या काम करतेय : स्थानिक कंत्राटदार
रस्त्याची लांबी : २ किलोमीटर ७०० मीटर
किती दराने कमी निविदा : १८.४५ टक्के
कमी दरामुळे वाचलेली रक्कम : ३ कोटी २८
कामाची एकूण किंमत : १७ कोटी ७९ लाख
कामाचा तपशील : व्हाईट टॉपिंग काँक्रीट व व्हर्ज
कुठून कुठपर्यंत रस्ता : एपीआय कॉर्नर ते कलाग्राम, एन-१ पोलीस चौकी ते सिडको बसस्थानक
महावितरण यंत्रणा हलविण्याचा खर्च : २ कोटी ८० लाख
काय म्हटले आहे पत्रात
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी एमआयडीसीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे, प्रोझॉन मॉल ते गरवारे स्टेडियम या भागात रस्त्याच्या कॅरिजवेमध्ये महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिन्या, डी.पी. येत आहेत. त्यामळे काम करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. मुख्य रहदारीचा रस्ता असल्यामुळे ते पूर्ण क्षमतेने रुंद होणे महत्त्वाचे आहे. मूळ अंदाजपत्रकात या कामासाठी पुरेशी तरतूद केलेली नाही. महावितरणची यंत्रणा इन्फ्रास्ट्रक्चर हटविण्यासाठी दोन कोटी ८० लाखांची गरज आहे. मनपा आणि महावितरणच्या आर्थिक परिस्थितीअभावी त्यांना हे काम करणे शक्य नाही. त्यामुळे एमआयडीसीने यासाठी निधी देऊन काम पूर्ण करावे.