एमजीएममधील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:59 IST2019-01-16T23:59:06+5:302019-01-16T23:59:42+5:30
मुंबईला जातो’, असे सांगून गेलेला एमजीएम संस्थेतील तंत्रनिकेतनमध्ये शिकणारा सनेश्वर सुखदेव नरवणे (१७, रा. कल्याण, मुुंबई) हा विद्यार्थी मागील सहा दिवसांपासून बेपत्ता आहे. ११ जानेवारीपासून त्याचा संपर्क होत नसल्याने त्याच्या आईने औरंगाबादेत येऊन बुधवारी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

एमजीएममधील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी बेपत्ता
औरंगाबाद : ‘मुंबईला जातो’, असे सांगून गेलेला एमजीएम संस्थेतील तंत्रनिकेतनमध्ये शिकणारा सनेश्वर सुखदेव नरवणे (१७, रा. कल्याण, मुुंबई) हा विद्यार्थी मागील सहा दिवसांपासून बेपत्ता आहे. ११ जानेवारीपासून त्याचा संपर्क होत नसल्याने त्याच्या आईने औरंगाबादेत येऊन बुधवारी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.
प्राप्त माहिती अशी की, सनेश्वर एमजीएममधील तंत्रनिकेतनच्या पहिल्या वर्षात शिकतो. काही विषयात तो अनुत्तीर्ण झाला. एमजीएममधील मुलांच्या वसतिगृहातील रूम नंबर २२२ मध्ये तो राहतो. ३ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता सनेश्वरने वसतिगृहाचे सुरक्षारक्षक गोविंद मुळे यांच्याकडे रजेचा अर्ज देऊन मुंबईतील घरी जातो, असे सांगून तो निघून गेला. ८ जानेवारी रोजी एक दिवस सनेश्वर महाविद्यालयात हजर होता. तो मुंबईला येत असल्याची कल्पना सनेश्वरने त्याच्या घरी दिली नव्हती. त्याची आई आणि बहीण त्यास सतत फोन लावत होते, मात्र तो फोन उचलत नव्हता. ११ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याच्या आईने त्यास फोन लावला तेव्हा एका स्त्रीने फोन उचलला आणि राँग नंबर म्हणून फोन कट केला. त्यानंतर काही वेळाने त्यांनी पुन्हा त्या नंबरवर संपर्क साधला तेव्हा सनेश्वरने फोन उचलला आणि फोन चार्जिंगला लावलेला असल्याने तेथे काम करणाऱ्या मावशीने फोन उचलल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी व्हिडिओ कॉल कर, असे त्या सनेश्वरला म्हणाल्यानंतर त्याने फोन कट केला. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद आहे. संपर्क तुटल्याने त्याची आई बुधवारी सकाळी एमजीएम वसतिगृहात आली. त्यानंतर एमजीएमचे सुनील कदम यांच्यासह त्या सिडको ठाण्यात गेल्या आणि त्यांनी सनेश्वर हरवल्याची तक्रार नोंदविली.