पैठणगेट ते गुलमंडी ‘स्ट्रीट फॉर पीपल’साठी व्यापाऱ्यांची सहमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 20:13 IST2020-11-23T20:10:35+5:302020-11-23T20:13:28+5:30
स्पर्धेंतर्गत स्ट्रीटस् फॉर पीपल उपक्रमासाठी उस्मानपुरा, कॅनाॅटसह पैठणगेट ते गुलमंडी या रस्त्यांची निवड

पैठणगेट ते गुलमंडी ‘स्ट्रीट फॉर पीपल’साठी व्यापाऱ्यांची सहमती
औरंगाबाद : पैठणगेट ते गुलमंडी हा रस्ता ‘स्ट्रीट फॉर पीपल’ करण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी रविवारी सहमती दर्शविली. पथदिवे, पार्किंग, हॉकर्सची समस्या सुटणार असेल, तर आम्ही कायम सोबत असल्याची ग्वाही व्यापाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या टीमला एका बैठकीत दिली.
केंद्र शासनाच्या शहरी विकास खात्याच्या अंतर्गत द इंडिया स्मार्ट सिटी मिशनने राष्ट्रीय स्तरावर ‘स्ट्रीटस् फॉर पीपल’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत औरंगाबाद शहरदेखील उतरले आहे. स्पर्धेंतर्गत स्ट्रीटस् फॉर पीपल उपक्रमासाठी उस्मानपुरा, कॅनाॅटसह पैठणगेट ते गुलमंडी या रस्त्यांची निवड केल्याची घोषणा मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या मार्गावरील दुकानदार व अन्य व्यावसायिकांशीदेखील चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार शनिवारी सांयकाळी स्मार्ट सिटीच्या सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, स्नेहा बक्षी, अर्पिता शरद, अभिलाषा अग्रवाल यांनी टिळकपथ येथे बैठक घेत व्यापाऱ्यांची मते जाणून घेतली. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, टिळकपथ व्यापारी असोसिएशनचे युसूफ मुकाती, हरविंदर सिंग सलुजा, भरत शहा, दिलीप चोटलानी आदींची उपस्थिती होती.
पैठणगेट ते गुलमंडी हा रस्ता कायम गजबजलेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना किमान चार हजार दुचाकी वाहने उभी असतात. रस्त्याला फुटपाथ नाही, पथदिवे असले तरी अपुरा प्रकाश पडतो. मोठा हायमास्ट बसविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी मांडले. व्यापाऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी हाॅकर्स आहेत. व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसण करीत स्मार्ट सिटी टीमने त्यांना हा रस्ता स्वच्छ, सुंदर आणि पादचाऱ्यांना चालण्यास योग्य केला जाईल, असा विश्वास दिला.