नसबंदी शस्त्रक्रियेकडे पुरुषांचा कानाडोळा

By Admin | Updated: July 5, 2014 00:40 IST2014-07-05T00:00:11+5:302014-07-05T00:40:43+5:30

उस्मानाबाद : महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेपेक्षा पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी आणि कमी वेळ खाणारी आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांना शासनाकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत.

Men's Stiffness Surgery | नसबंदी शस्त्रक्रियेकडे पुरुषांचा कानाडोळा

नसबंदी शस्त्रक्रियेकडे पुरुषांचा कानाडोळा

उस्मानाबाद : महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेपेक्षा पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी आणि कमी वेळ खाणारी आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांना शासनाकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु, जिल्हा परिषदचा आरोग्य विभागाकडून याबाबतीत अपेक्षित जनजागृती केली जात नसल्याने की काय, नसबंदी करून घेणाऱ्या पुरूषांची संख्या वर्षागणिक खालावू लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या तिपटीने घसरली आहे.
देशाची लोकसंख्या प्रचंड गतीने वाढू लागली आहे. या गतीला काही प्रमाणात का होईना; ‘ब्रेक’ लागावा या उद्देशाने शासनाकडून कुटुंब कल्याण कार्यक्रमावर भर दिला जात आहे. हा कार्यक्रमा आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळ्या सुविधा व आर्थिक मदतही दिली जात आहे. यासोबतच मागील काही वर्षांपासून पुरूष नसबंदी शस्त्रक्रियांवर भर दिला जात आहे. जनजागृतीसाठी शासन मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. परंतु, स्थानिक आरोग्य विभागाकडून शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेळखाऊही नाही. असे असतानाही केवळ तळागाळातील जनतेपर्यंत जनजागृती होत नसल्याने आणि शस्त्रक्रियेबाबत लोकांच्या मनातील गैरसमज काढून टाकण्यात आरोग्य विभाग कमी पडल्याने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याऐवजी झपाट्याने खाली येऊ लागले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सन २०१२-२०१३ या आर्थिक वर्षामध्ये शासनाने ४५० पुरूष नसबंदी शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले होते. यावेळी जवळपास १९ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. २०१३-२०१४ मध्येही शासनाने साडेचारशे शस्त्रक्रियांचेच उद्दिष्ट दिले होते. गावोगावी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करून शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्याबाबत शासनाने आरोग्य विभागाला वारंवार कळविले होते. परंतु, जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे शस्त्रक्रियांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. शस्त्रक्रियांची संख्या वाढण्याऐवजी तिपटीने घसरील आहे. साडेचारशेपैकी केवळ ५ शस्त्रक्रिया झाल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे. आरोग्य विभागाची ही चिंताजनक कामगिरी पाहून शासनाने यंदा जवळपास शंभरने उद्दिष्ट कमी केले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग यंदा तरी मरगळ झटकणार का? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Men's Stiffness Surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.