महापालिकेत मेअर फेलोंचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:40 IST2019-05-05T23:39:19+5:302019-05-05T23:40:03+5:30
महापालिकेतील दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी मेअर फेलो म्हणून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी काम कमी आणि उपद्व्यापच जास्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

महापालिकेत मेअर फेलोंचा उच्छाद
औरंगाबाद : महापालिकेतील दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी मेअर फेलो म्हणून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी काम कमी आणि उपद्व्यापच जास्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महापालिकेतील गोपनीय फायलींची पाहणी करणे, फोटो कॉपी करणे, मनपातील डाटा काही विशिष्टांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करीत असल्याचे समोर येत आहे. मेअर फेलो उपक्रमाला आता पूर्णविराम द्यावा, अशी मागणी त्रस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही फेलोंची नेमणूक केली आहे. त्याच धर्तीवर मनपा आयुक्तांनीही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांची मेअर फेलो म्हणून वर्षभरापूर्वी नियुक्ती केली. या १४ विद्यार्थ्यांना दरमहा पगारही खाजगी कंपन्या देत आहेत. त्यांच्या सेवेचा मागील वर्षभरात मनपाला, शहराला किंचितही फायदा झालेला नाही. ज्या विभागात या विद्यार्थ्यांची नेमणूक केली आहे, त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. काही मेअर फेलो फक्त हेरगिरीचे काम करीत आहेत. कोणता अधिकारी किती वेळ कार्यालयात बसतो, कोणता कर्मचारी किती तास काम करतो याची माहिती जमा करून थेट आयुक्तांना देण्यात येत आहे. आयुक्तही मेअर फेलोंवर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांना फैलावर घेत आहेत. वास्तविक पाहता संबंधित कर्मचारी १८ तास काम करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांना कार्यालयात थांबावे लागते. याचे किंचितही भान प्रशासनाला राहिलेले नाही. फेलोंच्या तक्रारींमुळे कर्मचारी, अधिकाºयांचे मनोबल दिवसेंदिवस खालावत आहे. महापालिकेतील काही फायली या अत्यंत गोपनीय असतात. हे फेलो या फायलींचीही हाताळणी करीत असल्याचे समोर आले आहे. अखेर गोपनीय फायलींची फोटो कॉपी मोबाईलमध्ये घेण्याचा त्यांचा नेमका उद्देश काय? असाही प्रश्न कर्मचाºयांकडून उपस्थित करण्यात येतो. ज्या उद्देशासाठी या फेलोंची निवड केली आहे, तो उद्देश बाजूला सारून दुसरीच कामे सध्या सुरू आहेत.
------------