महापौर-नगरसेवकात जुंपली !
By Admin | Updated: April 17, 2015 00:40 IST2015-04-17T00:27:35+5:302015-04-17T00:40:16+5:30
लातूर : महापालिकेच्या वतीने चार महिन्यांपूर्वी सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अपूर्णावस्थेतच थांबली.

महापौर-नगरसेवकात जुंपली !
लातूर : महापालिकेच्या वतीने चार महिन्यांपूर्वी सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अपूर्णावस्थेतच थांबली. खोरी गल्लीतील सिल्व्हर ज्युबली रोड दोन्ही बाजूंनी गटार व रस्त्याला अडथळा ठरणारी घरे, दुकानेही पथकाने हटविली. मात्र त्यानंतर काम गतीने होत नसल्याने वारंवार प्रशासनाला विनंती करूनही संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा उद्रेक गुरुवारी झाला. महापौर अख्तर शेख व नगरसेवक राजा मणियार यांच्यात दुपारी १२ वाजता वादावादी झाली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मणियार यांचा प्रभाग असलेल्या खोरी गल्ली भागात सर्वप्रथम अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढताना स्वत: महापौर, उपमहापौर यांच्यासह मनपाचे अनेक अधिकारी, कर्मचारीही उभे होते. रस्ता व गटारीचे काम करण्यात येणार असल्याने किरकोळ विरोध झाला. गरिबांची दुकानेही पथकाने पाडली. मात्र काही धनदांडग्यांचे अतिक्रमण न काढताच काम सुरू झाले. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून संथ गतीने काम सुरू असल्याने काम तात्काळ करावे, यासाठी नगरसेवक राजा मणियार गुरुवारी दुपारी आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याकडे गेले. तद्नंतर महापौरांनाही त्यांनी कामासाठी विनंती केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. सत्ताधारी विरोधकांची कोंडी करीत असल्याचा आरोप मणियार यांनी केला. यावेळी उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख, शैलेश स्वामी, पूजा पंचाक्षरी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)