छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेसेनेत उफाळलेला अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला आहे. उपमहापौर पदाच्या उमेदवारीवरून सुरू झालेला पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद आता गटनेते पदापर्यंत येऊन ठेपला आहे. या वादावर भाष्य करताना पालकमंत्री शिरसाट यांनी चक्क "जंजाळ भविष्यात मुख्यमंत्री होवोत," अशा शुभेच्छा देत खोचक टोला लगावला आहे.
जंजाळ यांचा आरोप अन् शिरसाट यांचं प्रत्युत्तर "संजय शिरसाट यांना त्यांच्या मुलीला हर्षदा शिरसाटला उपमहापौर करायचे होते, म्हणून त्यांनी माझ्या उमेदवारीला विरोध केला," असा जाहीर आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले असता पत्रकारांनी यावर विचारले असता शिरसाट यांनी उपरोधिकपणे उत्तर दिले. "जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी आता चांगले काम करावे आणि पुढे जाऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत," असे शिरसाट म्हणाले.
आता 'गटनेते' पदावरून रणसंग्राम उपमहापौर पद तर जंजाळ यांनी पटकावले, मात्र आता महापालिकेतील 'गटनेते' पदावरून दोघांमध्ये नवी हमरीतुमरी सुरू झाली आहे. शिरसाट यांनी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचे नाव पुढे केले असून, १३ पैकी १० नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, जंजाळ यांनी हा दावा फेटाळून लावत त्र्यंबक तुपे यांच्या नावाला तीव्र विरोध केला आहे.
शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष पक्षात निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका जंजाळ यांनी मांडली आहे. "जोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकृत निरोप येत नाही, तोपर्यंत गटनेते पदाचा निर्णय होणार नाही," असा पवित्रा जंजाळ यांनी घेतल्याने पेच अधिकच वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हा 'हायव्होल्टेज' राजकीय ड्रामा आता नेमका कुठे थांबतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Internal conflict escalates in Sambhajinagar Shinde Sena. Shirshat's sarcastic blessing for Janjal to become CM highlights the ongoing power struggle over deputy mayor and party leadership positions, pending Shinde's decision.
Web Summary : संभाजीनगर शिंदे सेना में आंतरिक कलह बढ़ गया है। शिरसाट का जंजाल को मुख्यमंत्री बनने का व्यंग्यात्मक आशीर्वाद उपमहापौर और पार्टी नेतृत्व पदों पर जारी सत्ता संघर्ष को उजागर करता है, शिंदे का निर्णय लंबित।