बारावीच्या ७0 टक्के गुणपत्रिका बोर्डातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:09 AM2018-06-14T00:09:14+5:302018-06-14T00:10:15+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव व प्रभारी अध्यक्षा सुगता पुन्ने तीन दिवसांपासून रजेवर असल्यामुळे बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप रखडले आहे. प्राप्त माहितीनुसार सुमारे ७० टक्के गुणपत्रिका मंडळाच्या कार्यालयातच पडून आहेत.

Marks of 70 percent marks in HSC board | बारावीच्या ७0 टक्के गुणपत्रिका बोर्डातच पडून

बारावीच्या ७0 टक्के गुणपत्रिका बोर्डातच पडून

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय सचिव सतत रजेवर : गुणपत्रिकांचे वाटपही रखडले

राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव व प्रभारी अध्यक्षा सुगता पुन्ने तीन दिवसांपासून रजेवर असल्यामुळे बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप रखडले आहे. प्राप्त माहितीनुसार सुमारे ७० टक्के गुणपत्रिका मंडळाच्या कार्यालयातच पडून आहेत.
बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना १२ जूनला गुणपत्रिका मिळणार असल्याचे घोषित केले होते; परंतु विभागीय मंडळाच्या दिरंगाईमुळे १२ जूनला महाविद्यालयांनाच गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. दुसऱ्या दिवशीही मंडळांतर्गतच्या पाचही जिल्ह्यांतील बहुतांश महाविद्यालयांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दहावी, बारावीच्या निकालावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. काहींचे निकाल राखीव ठेवलेले आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी अधिकारीच नसल्यामुळे विद्यार्थी व महाविद्यालयांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
याविषयी अधिक माहिती घेतली असता, विभागीय सचिव तथा प्रभारी अध्यक्षा सुगता पुन्ने याच मागील तीन दिवसांपासून रजेवर आहेत. त्या कधी येणार, याविषयी कार्यालयातील कर्मचारी माहिती देण्यास तयार नव्हते. याच कार्यालयात हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी, पालक आले होते. अनेकांचे निकाल राखीव ठेवलेले होते. काहींचे पुनर्तपासणीचे प्रस्ताव होते. या पालकांना कर्मचारी संबंधित फाईल सचिवांच्या दालनात असल्याचे उत्तर देत होते. यावर हतबल होऊन अनेक जण निघून जात होते. याच कार्यालयातील इतरही काही उच्चपदांवरील अधिकारी रजेवर गेलेले आहेत. ऐन निकालाच्या आणि गुणपत्रिकांच्या वाटपावेळी अधिकारी रजेवर गेल्यामुळे विद्यार्थी, पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याविषयी सचिव सुगता पुन्ने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अध्यक्ष पदभार घेईनात, सचिवांना बदलीचे वेध
विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी शिक्षण विभागाचे उपसंचालक वैजनाथ खांडके यांची पदोन्नती झाली आहे; मात्र त्यांनी पदोन्नती घेण्यास नकार दिल्यामुळे सचिव पुन्ने यांच्याकडेच प्रभारी अध्यक्ष म्हणून पदभार कायम आहे. यातच पुन्ने यांनाही बदलीचे वेध लागले आहेत. यामुळे त्याही सतत रजेवर जात आहेत.

Web Title: Marks of 70 percent marks in HSC board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.