छत्रपती संभाजीनगर : महानुभव आश्रम ते रेल्वे स्टेशन उड्डाणपुलापर्यंतचा रस्ता ४५ मीटर आहे. उड्डाणपुलाच्या बाजूला दोन्ही बाजूंनी २० मीटर अंतरात अनेक पक्की बांधकामे होती. मंगळवारी महापालिकेच्या दोन पथकांनी दुपारी २:३० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत तब्बल १३७ कच्ची आणि पक्की बांधकामे जमीनदोस्त केली. यात व्यावसायिक मालमत्तांचा जास्त समावेश होता.
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने तीन महिन्यांपूर्वीच उड्डाणपुलाच्या एका बाजूला असेलेली अनधिकृत दुकाने जमीनदोस्त केली होती. उर्वरित बांधकामांना हात लावले नव्हते. मनपावर एकतर्फी आणि हेतूपुरस्सर कारवाई करण्याचा आरोप करण्यात येत होता. मंगळवारी पैठण रोडवरील कारवाईचा समारोप करण्यापूर्वी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेली बांधकामे पाडण्याचा निर्णय सोमवारीच घेण्यात आला. तातडीने नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांनी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी २० मीटर अंतर मोजून मार्किंग केली. मार्किंगनुसार मालमत्ताधारकांना किती भाग पाडण्यात येणार याचा अंदाज आला होता. रात्रीतून काही मालमत्ताधारकांनी नुकसान टाळण्यासाठी सामान हलविले होते. काही सामान हलविण्याच्या तयारीत होते. पैठण रोडवरील कारवाई संपताच मोहिमेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महानुभव आश्रम चौकातच जेवण केले. त्यानंतर लगेच उड्डाणपुलाच्या बाजूला कारवाई करण्यासाठी दोन पथक सरसावले.
अनेक पक्की बांधकामेउड्डाणपुलाच्या बाजूला एक टायर विक्रीचे दुकान असलेल्या व्यापाऱ्याला त्याची महागडी यंत्र साम्रगीही काढायला वॉर्ड अधिकारी यांनी परवानगी दिली नाही. त्यांचे पक्के बांधकाम ३ जेसीबी लावून पाडण्यात येत होते. तीन दुकाने पाडण्यासाठी दोन तास पथकाला लागले. एका ठिकाणी तरुणांनी कारवाईला विरोध दर्शविला. पोलिस, माजी सैनिकांनी त्यांची समजूत घातल्यानंतर वाद निवळला. २० मीटर जागा सोडून ज्या मालमत्ताधारकांनी बांधकाम केले. त्यांच्या बांधकामाला मनपाने हातही लावला नाही. यातील बहुतांश मालमत्ताधारकांनी बांधकाम परवानगी घेतलेली होती, हे विशेष.