जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट!

By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:03:46+5:302014-07-16T01:26:23+5:30

तीर्थपुरी : परिसरात काही ठिकाणी अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. जेमतेम पावसावर ज्या शेतकऱ्यांनी सरकीची लागवड केली ती पूर्णपणे धोक्यात आली आहेत.

Market market suspicion! | जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट!

जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट!

तीर्थपुरी : तीर्थपुरीसह परिसरात काही ठिकाणी अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. जेमतेम पावसावर ज्या शेतकऱ्यांनी सरकीची लागवड केली ती पूर्णपणे धोक्यात आली आहेत. पाऊस नसल्याने आठवडी बाजार व व्यापारीपेठेत चांगलाच शुकशुकाट दिसून येत आहे.
पावसाळा सुरू होऊन जवळपास ३८ दिवस झाले असले तरी अद्यापपर्यंत पेरणी करण्यासारखा पाऊस कोठेच झाला नाही. मात्र, कंडारी रामसगाव, जोगलादेवी, बानेगाव, मुरमा, कोठी, खडका आदी ठिकाणी चार दिवसांपूर्वी थोडा पाऊस झाला होता. परत पाऊस येईल, असे गणित शेतकऱ्यांनी उराशी बांधून तेथील शेतकऱ्यांनी सरकीची लागवड केली आणि पाऊस बंद झाला. त्यामुळे त्या सरक्या अद्यापपर्यंत उगल्या नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे पहात पांढरे झाले आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हैराण झाल्याने तीर्थपुरी, अं. टेंभी येथील आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच तीर्थपुरीच्या बाजारपेठेतही शुकशुकाट दिसत आहे. गारपिटीचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांची हाती पडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गाठीलाही पैसा नाही. परिणामी अनेक गावातील आठवडी बाजारांत शांतता आहे. आर्थिक उलाढाल कमालीची मंदावली आहे. पाऊस नसल्याने आठवडी बाजारात तुरळक होत असल्याने व्यापारी वर्गही हवालदिल झाला आहे.
घनसावंगी तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण असते. प्रत्यक्षात पाऊस मात्र पडत नाही. तीर्थपुरीचा काही भागात जायकवाडीच्या डाव्या कालव्यामुळे सुजलाम सुफलाम बनला खरा. परंतु कालव्यातही थेंबभर पाणी नसल्याने हरितपट्टा रुक्ष होतो की काय असा गंभीर सवाल शेतकरी, ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
अर्धा भोकरदन तालुका अद्यापही कोरडाठाक
पारध : भोकरदन तालुक्यात केवळ काही गावातच बुधवारचा पाऊस झाला. दानापूरपासून पारधपर्यंतच्या गावात थेंबभरही पाऊस पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले.
बुधवारी पाच वाजेपासून भोकरदनसह परिसरात ते दानापूरपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, दानापूरपासून पारध दरम्यान, कोठेच पाऊस झाला नाही. पारध परिसरात काही प्रमाणात मिरची व कपाशी वगळता कोणतीच पेरणी पावसाअभावी झालेली नाही. शेतकऱ्यांनी महागा मोलाची बियाणे घरात आणून ठेवलेली आहेत. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पहात आहेत. मात्र जो दिवस उगवतो तो सारखाच केव्हा तरी दिवसातून एखाद्या वेळेस आकाशात ढग दाटून येतात व क्षणात कडक ऊन पडते. पावसाचा थेंब पडत नाही. जुलै महिना अर्ध्यावर येवून ठेपला. सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग, पेरणीचा कालावधी संपून गेला आता पाऊस पडला तरी नेमके कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न पारध परिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांनी बँकांकडून पीककर्ज घेऊन बियाणे, खत, औषधी खरेदी करून ठेवली आहे. पाऊस पडलाच नाही तर उत्पादन कसे काढणार व घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार असाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या आधारावर कपाशी व मिरची लावलेली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून विहिरीतील पाणी पातळी खालावली असल्यामुळे ही पिकेही उगवणे अवघड झाले आहे. एकंदर पारध परिसरावर दुष्काळाचे संकट घोंगावत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.
भारज : गेल्या वर्षीच्या कडू आठवणी डोळ्याआड टाकून पुन्हा एकदा बळीराजा पेरणी तसेच लागवड करण्यास जुंपला आहे. भारज परिसरात पेरणीयोग्य पाहिजे तसा अद्यापही पाऊस झाला नाही. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना संपला. थोड्या फार पावसाच्या भरवशावर अखेर पेरणी सुरू करावीच लागली. वेळ निघून जात असल्याने हातावर हात देऊन बसणे कसे जमणार अशा विवंचनेत अखेर जेमतेम पावसावर शेतकरी पेरणीकडे वळाला आहे. भारज परिसरात सोयाबीन, मका, कपाशी, भाजीपाला अशी प्रमुख पिके घेतली जातात.
मागील हंगामात उत्पादन कमी आणि मालाला बाजारभावही कमी मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. यामुळे या हंगामावर मोठी आशा होती. मात्र, सुरुवातीलाच निसर्गाच्या अवकृपेने पाऊस लांबला आणि उशिरा पेरण्या सुरू झाल्या तरी चांगला पाऊस होऊन उत्पादन हाती येईल, या अपेक्षेने पुन्हा धरणी मातेच्या उदरात धान्य पेरण्याला सुरूवात केली. समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ येणार आहे.
कृषी सहायक गावाकडे फिरकेना, मार्गदर्शनाची गरज
वाटूर फाटा : महिनाभर दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात येण्यास सुरूवात केली. परंतु ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कपाशीविषयक मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. परंतु काही शेतकरी कोणते औषध आणावे, कोणते खत द्यावे, याविषयी संभ्रमात असल्याचे समजते. तसेच फळबाग, ऊस या शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अनेक कृषी सहायक गावात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. फळबागांमध्ये या परिसरामध्ये मोसंबी बागा आता फुलोऱ्यात आहेत. मोसंबी उत्पादकांना विशेष शिबीर घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. काही शेतकऱ्यांना तर आपल्या गावासाठी कोणते कृषी सहायक आहेत आणि ते कोठे असतात हे सुद्धा माहीत नाही. एकूणच कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. गारपिटीचे पंचनामेही थातूरमातूरच करण्यात आले. काही शेतकऱ्यांना अनुदान मिळोले तर काही जण अद्यापही वंचित आहेत. गारपिटीचे अनुदान तात्काळ अनुदान देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Market market suspicion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.