मार्डच्या डॉक्टरांचा संप मिटला
By Admin | Updated: October 10, 2014 00:43 IST2014-10-10T00:38:48+5:302014-10-10T00:43:24+5:30
औरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या कारणावरून घाटीतील निवासी डॉक्टरांनी सुरू केलेला संप आज तिसऱ्या दिवशी गुरुवारी मागे घेतला.

मार्डच्या डॉक्टरांचा संप मिटला
औरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या कारणावरून घाटीतील निवासी डॉक्टरांनी सुरू केलेला संप आज तिसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मागे घेतला. विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवासी डॉॅक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. या संपामुळे घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत झाली होती.
घाटीच्या मेडिसीन विभागात कार्यरत असलेले निवासी डॉक्टर हेमंत चिमुटे व त्यांचे सहकारी आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात सोमवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. याप्रसंगी डॉ. चिमुटे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.
घटनेनंतर सुमारे २४० निवासी डॉक्टर संपावर गेले होते. सलग तीन दिवस संप सुरू असल्याने घाटीची आरोग्यसेवा ठप्प झाली होती. केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. संप मिटावा यासाठी अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मगरे हे संपकरी डॉक्टरांशी चर्चा करीत होते. मात्र, आरोपींवर डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात यावेत, त्यांना अटक करावी, तसेच निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी आदी मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका मार्डने घेतली होती. संप चिघळत असताना बुधवारी पोलीस आयुक्तांना भेटून मार्डने निवेदन दिले. त्यावेळी आयुक्तांनी त्यांना आरोपींविरोधात नवीन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात येईल, असे आश्वासन दिले. मार्डने संप मागे घेतल्याचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश चेवले यांनी सांगितले. डॉक्टर सायंकाळी ६ वाजता कामावर रुजू झाले.