औरंगाबाद : मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे. झपाट्याने पाणीपातळी कमी होत असताना जलयुक्त शिवार योजनेतील पाणी कुठे मुरले हे कळण्यास मार्ग नाही. विभागात २३०० कोटींच्या आसपासचा खर्च जलयुक्त शिवार योजनेवर करण्यात आला आहे. असे असताना विभागातील फक्त ११ तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे.७६ पैकी ६५ तालुक्यात बोअरला पाणी लागण्याची परिस्थिती नाही. तर ११ तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. २३ तालुक्यांत ३ मीटरपर्यंत, २० तालुक्यांत ३ मीटरपेक्षा जास्त, तर १५ तालुक्यांत २ मीटर खालपर्यंत पाणीपातळी घटली आहे. ७ तालुक्यांत १ मीटरपर्यंत पाणीपातळी आहे.पाच वर्षांपूर्वी आॅक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांत तपासलेल्या भूजल पातळीच्या अंदाजनुसार यंदा अडीच ते तीन मीटरदरम्यान पाणीपातळी खाली गेली आहे. कमी पर्जन्यमान, जमिनीत पाणी मुरविण्याच्या योजनांतून काहीही साध्य न होणे, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही यशस्वी होण्यात अडथळे आल्याने भूजल पातळीत वाढ होऊ शकली नाही, असेच म्हणावे लागेल. विभागातील ८७५ विहिरींच्या निरीक्षणातून भूजल सर्वेक्षण विभागाने पाणीपातळीत घट झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. पुढील काही महिन्यांत यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.३५०० गावांत जलयुक्त शिवार योजनामराठवाड्यातील ३५०० गावांत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यातून तीन वर्षांत ८.१९ लक्ष टीसीएम पाणी मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. तरी पूर्ण विभाग दुष्काळाच्या छायेखाली आल्याने योजनेवर खर्च करण्यात आलेले २ हजार ३०० कोटींचे पाणी कुठे मुरले, हा प्रश्न आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत १ लाख ५९ हजार ५९९ कामे मराठवाड्यात पूर्ण करण्यात आली. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर का, याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसले आहे. साचलेले पाणी जमिनीत किती प्रमाणात मुरले याची माहिती पुढे येणे अपेक्षित आहे.
मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच मीटरने खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:56 IST
मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. म्हणजेच मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास १० फुटांच्या आसपास पाणी खोलवर गेले आहे.
मराठवाड्यातील भूजल पातळी अडीच मीटरने खाली
ठळक मुद्दे ६५ तालुके ड्राय : विभागातील फक्त ११ तालुक्यांत पाणीपातळीत वाढ