मराठवाड्यात पावसाची तूट कायम

By Admin | Updated: September 8, 2014 00:35 IST2014-09-08T00:15:29+5:302014-09-08T00:35:08+5:30

औरंगाबाद : आॅगस्टअखेरीस सर्वत्र जोरदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील पावसाची तूट कायम आहे.

Marathwada rain deficit continued | मराठवाड्यात पावसाची तूट कायम

मराठवाड्यात पावसाची तूट कायम

औरंगाबाद : आॅगस्टअखेरीस सर्वत्र जोरदार पाऊस होऊनही मराठवाड्यातील पावसाची तूट कायम आहे. विभागात ७ सप्टेंबरपर्यंत सरासरी ५७९ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात आजपर्यंत सरासरी ३५७ मिमी इतकाच पाऊस झाला आहे. हा पाऊस आजपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या तब्बल ३९ टक्के कमी आहे. मराठवाड्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाचे सावट निर्माण झाले. संपूर्ण जून महिना कोरडा गेला. मराठवाड्यात कुठेही पाऊस न झाल्यामुळे ठिकठिकाणची लहान- मोठी धरणे कोरडी पडली. त्यामुळे विभागात सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जुलै महिन्यातही जेमतेम पाऊस झाला. आॅगस्टअखेरीस मात्र आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला, तरीही आधीचे दोन महिने खूपच कमी पाऊस झाल्यामुळे पावसाला अद्याप अपेक्षित सरासरी गाठता आलेली नाही. मराठवाड्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७७९ मिमी इतके आहे, तर आजपर्यंतची अपेक्षित सरासरी ५७९ मिमी आहे. मात्र, विभागात आजपर्यंत सरासरी ३५७ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी विभागात आजपर्यंत अपेक्षित सरासरीच्या ७८ टक्के पाऊस झाला होता. यंदा हे प्रमाण अवघे ६१ टक्के आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे अवघा ४९ टक्के पाऊस झाला आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या ७१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाअपेक्षित पाऊस पडलेला पाऊसटक्केवारी (मिमी) (मिमी) औरंगाबाद५०६ ३५६ ७० जालना५१४ ३१८ ६१ परभणी५८५ ३१८ ५४ हिंगोली६८० ३९० ५७ नांदेड७१६ ३५६ ४९ बीड४९१ ३३३ ६७ लातूर५९६ ३९३ ६६ उस्मानाबाद५४४ ३८९ ७१ एकूण५७९ ३५७ ६१ तीन महिने उलटले तरी पुरेसा पाऊस न झाल्याने सप्टेंबर महिन्यावर संपूर्ण मदार अवलंबून आहे. जायकवाडीत ३५ टक्के; विभागात ३० टक्के पाणीसाठा जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वच भागांतील धरणे ओसंडून वाहत असली, तरी मराठवाड्यातील प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. विभागातील लहान, मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून सरासरी ३० टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी धरणात मात्र ३५ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागातील १५४ प्रकल्पांमध्ये सरासरी ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर पुणे विभागातील ३६८ धरणेही ओसंडून वाहत आहेत. येथील प्रकल्पांमध्ये ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागात ७३ टक्के, नाशिक विभागातील प्रकल्पही सरासरी ६६ टक्के भरले आहेत. मराठवाड्यात मात्र आजही केवळ ३० टक्के साठा आहे. मराठवाड्यात एकूण ११ मोठे प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये केवळ ३७ टक्के साठा आहे. मध्यम प्रकल्पांची परिस्थिती याहीपेक्षा नाजूक आहे. विभागातील ७५ प्रकल्पांत सरासरी अवघा १७ टक्के साठा आहे, तर लघु प्रकल्पांमध्ये हा साठा १२ टक्के आहे. मराठवाड्यात एकूण ७१८ लघु प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांतील साठा अजूनही जोत्याखालीच आहे. चार मोठे प्रकल्प कोरडेच विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सिद्धेश्वर, मांजरा, निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव ही धरणे अजूनही कोरडीच आहेत, तर सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ३५ टक्के साठा आहे. येलदरी धरणात ४६ टक्के, माजलगाव धरणात ७ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा धरणात ६० टक्के, मनार धरणात २२ टक्के, विष्णुपुरी धरणात शंभर टक्के आणि निम्न दुधना धरणात ६२ टक्के साठा आहे.

Web Title: Marathwada rain deficit continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.