मराठवाडा ही कलावंतांची भूमी
By Admin | Updated: August 26, 2014 01:52 IST2014-08-26T01:17:41+5:302014-08-26T01:52:24+5:30
औरंगाबाद : मराठवाडा ही लोककलावंतांची भूमी आहे. या भागातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असून, त्यांच्यामध्ये राज्यस्तरावर झळकण्याची क्षमता आहे

मराठवाडा ही कलावंतांची भूमी
औरंगाबाद : मराठवाडा ही लोककलावंतांची भूमी आहे. या भागातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असून, त्यांच्यामध्ये राज्यस्तरावर झळकण्याची क्षमता आहे, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित युवा महोत्सव कार्यशाळेच्या समारोप समारंभात महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी मुंबई येथील लोककला अकादमीचे डॉ. गणेश चंदनशिवे, माजी अधिष्ठाता प्रा. दिलीप बडे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे, सल्लागार समिती सदस्य डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. राजेश करपे आदींची उपस्थिती होती.
मनपा आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर तसेच राज्यस्तरावर नावलौकिक मिळविणारे कलावंत दिले. या मातीत उपजत कलेचा गुण आहे. त्यामुळे विद्यापीठाने युवा कलावंतांना युवक महोत्सवाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून युवा कलावंतांमधील कलेची प्रतिभा अधिकच बहरत गेली. यापुढेही विद्यापीठाने युवा कलावंतांना प्रोत्साहन द्यावे.
या कार्यक्रमात डॉ. गणेश चंदनशिवे यांना संगीत कला अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाने आपणास प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आज राज्यस्तरावर लौकिक प्राप्त करूशकलो, अशी ग्वाही डॉ. चंदनशिवे यांनी दिली. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, मराठवाड्याला संतपरंपरेचा वारसा आहे. संतांनी या भागात लोकप्रबोधनाची परंपरा सुरू केली. नंतरच्या काळात लोककलावंतांनी प्रबोधनाची चळवळ पुढे नेली. विद्यार्थ्यांनी या परंपरेचा आदर्श ठेवला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी मानले.