मराठवाड्याला विविध क्षेत्रांत नेतृत्व हवे
By Admin | Updated: June 21, 2014 01:00 IST2014-06-21T00:41:27+5:302014-06-21T01:00:50+5:30
औरंगाबाद : मराठवाड्याला आता विकासासाठी केवळ राजकीय नेतृत्वावरच अवलंबून राहून चालणार नाही, तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक नेतृत्वाचीही तेवढीच गरज असल्याचे
मराठवाड्याला विविध क्षेत्रांत नेतृत्व हवे
औरंगाबाद : मराठवाड्याला आता विकासासाठी केवळ राजकीय नेतृत्वावरच अवलंबून राहून चालणार नाही, तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक नेतृत्वाचीही तेवढीच गरज असल्याचे प्रतिपादन आज येथे पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक श्रुती तांबे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने मराठवाड्याचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. आर.पी. कुरूलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘मराठवाड्याचा विकास : कर्ते, आंदोलन आणि संभाषिते’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योगपती राम भोगले हे होते. प्रारंभी, डॉ. कुरूलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सहस्र विकास ध्येयाची पूर्तता २०१५ आता उंबरठ्यावर आली असताना कशी काय करणार, असा सवाल प्रा. तांबे यांनी यावेळी उपस्थित केला. विकासाच्या अनुषंगाने त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट, स्लम फ्री सिटी, स्त्रियांचे आरोग्य, सामाजिक वर्जिता, पर्यावरण या मुद्यांचे सविस्तर विश्लेषण केले. त्या म्हणाल्या, विकासाची जाण सामान्य माणसांमध्ये निर्माण करण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत. विकास हा समतापूर्ण आणि शाश्वत असला पाहिजे. केवळ शिक्षण आणि अर्थकारण यावरच आपण आतापर्यंत भर देत आलो. विकास हा चिरंजीवी असावा. छोटे छोटे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू व्हायला हवेत.
नवउदारमतवादाच्या वारूत पर्यावरण हा अडथळा बनला असून हे कोडे सोडवले गेले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न हाताळताना प्रा.तांबे यांनी बीड जिल्ह्यातील स्त्रीभ्रूणहत्यांचे वाढते प्रकार, तेथील स्त्रियांचे लैंगिक शोषण, बलात्कार याकडे आकडेवारीनिशी उपस्थितांचे लक्ष वेधले. यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे कल्चरल व्हायोलन्स होय. तुम्हाला मोकळेपणाने तुमचा चॉईस नसेल तर मग विकासाच्या बाता मारून काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अध्यक्षीय समारोपात राम भोेगले यांनी विकासाच्या नावाखाली पाश्चात्त्यांचे अंधानुकरण चालू असल्याचा आरोप केला. आपल्या देशाला जे उपयुक्त आहे, जे योग्य आहे, त्या दिशेने विकसित होत जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. बालकामगार नकोतच या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला. बाल कामगार कुठे नको, कुठे चालतील, हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
आपण उद्योगांच्या विकेंद्रीकरणाचा विचारच स्वीकारला नाही. उलट उद्योगांचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण सुरू आहे. इंग्लंडसारख्या देशात पर्यावरण संतुलन साधत खेड्यागणिक छोटे- छोटे उद्योग निर्माण केले गेले आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. फेसलेस पॉप्युलेशनमुळे गुन्हेगारी वाढतच जाणार असल्याचे मत राम भोगले यांनी नोंदवले. समाजाला काही परत द्यावे, ही उद्योजकांकडून करण्यात येणारी अपेक्षा पूर्ण होत नाही, असेही ते म्हणाले. आंदोलन त्सुनामीसारखे असावे. क्षणार्धात सारे बदलून टाकणारे असावे, असे मत भोगले यांनी यावेळी व्यक्त केले.
संस्थेचे सचिव प्रा. सुरेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संचालक डॉ. शरद अदवंत यांनी आभार मानले. भुजंगराव कुुलकर्णी, ना.वि. देशपांडे, श्रीराम वरूडकर, दिनकर बोरीकर, तारा लड्डा, अॅड. प्रदीप देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.