मराठवाडा गुटखा तस्करांच्या विळख्यात; दरमहा १०० कोटींची होते तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:16 IST2018-02-12T13:13:17+5:302018-02-12T13:16:23+5:30
राज्यात गुटखा विक्री व उत्पादनांवर बंदी असतानाही परप्रांतातून दरमहा अंदाजे १०० कोटींच्या आसपास गुटखा चोरट्या वाहतुकीने येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस, अन्न व औषधी प्रशासन वारंवार कारवाया करून गुटखा जप्त करून नष्ट करीत असले तरी या विभागात गुटख्याची तस्कारी सुरूच आहे.

मराठवाडा गुटखा तस्करांच्या विळख्यात; दरमहा १०० कोटींची होते तस्करी
औरंगाबाद : राज्यात गुटखा विक्री व उत्पादनांवर बंदी असतानाही परप्रांतातून दरमहा अंदाजे १०० कोटींच्या आसपास गुटखा चोरट्या वाहतुकीने येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस, अन्न व औषधी प्रशासन वारंवार कारवाया करून गुटखा जप्त करून नष्ट करीत असले तरी या विभागात गुटख्याची तस्कारी सुरूच आहे.
हैदराबादमार्गे नांदेड जिल्ह्यातील हुमनाबाद व लातूर जिल्ह्यातील उमरगा या चेकपोस्टमधून गुटखा घेऊन येणार्या ट्रक मराठवाड्यात येतात. दिवसाकाठी १० ते १५ ट्रक या विभागात एफडीए आणि पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन येतात. प्रत्येक वाहनात २५ लाखांच्या आसपास गुटखा असतो. विभागातील प्रत्येक तालुक्यामध्ये गुटखा वितरित करणार्यांचे नेटवर्क आहे. रविवारी बीड जिल्ह्यात २५ लाखांचा गुटखा जप्त करण्याची घटना घडली. एवढा माल बीड जिल्ह्यात कुठून आला. गुटखा जप्तीच्या वारंवार कारवाया होत आहेत. तरीही गुटखा घेऊन येणार्या ट्रक्स विभागात पोलिसांच्या आशीर्वादाने तर येत नाहीत ना, असा प्रश्न पुढे येत आहे.
दरम्यान, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष रविशंकर मुंडे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना गुटखाबंदी करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. गुटख्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, शाळा, महाविद्यालय आवारात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. राज्यात गुटखाबंदी असताना मराठवाड्यात परप्रांतांतून येणार्या ट्रक्समधून तालुका पातळीपर्यंत गुटखा वितरित होतो. त्या ट्रक्स कुणाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात येतात. वितरक, ट्रक, चेकपोस्टमधून कशा सोडल्या जातात. यातून किती कोटींची उलाढाल होते, याचा पूर्ण माहितीसह मंत्रालयावर उपोषण करण्याचा इशारा मुंडे यांनी निवेदनातून दिला आहे.
सहायक आयुक्त काय म्हणतात...
अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त चंद्रकांत पवार यांनी लोकमतशी बोलताना दावा केला, आजवर ५ कोटींचा गुटखा जप्त करून तो नष्ट केला आहे. मराठवाड्यात गुटखा वितरणाचे नेटवर्क शोधून तेथील गुटखा जप्त करण्याची मोहीम सुरूच आहे. १०० कोटींच्या आसपास गुटख्याची तस्करी विभागात होत असल्याप्रकरणी त्यांना विचारले असता, ते म्हणाले, निश्चित सांगता येणार नाही; परंतु विभागात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत.