मराठवाडा ढगाळला!
By Admin | Updated: November 5, 2016 01:29 IST2016-11-05T01:16:21+5:302016-11-05T01:29:43+5:30
औरंगाबाद : प. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर न होता डीप डिप्रेशन अर्थात घनदाबाचे क्षेत्रात रुपांतर झाले.

मराठवाडा ढगाळला!
औरंगाबाद : प. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर न होता डीप डिप्रेशन अर्थात घनदाबाचे क्षेत्रात रुपांतर झाले. ते उत्तर पूर्व भागात म्हणजेच पश्चिम बंगालकडे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी विदर्भ व पूर्ण मराठवाडा भागात ढगाळ वातावरण होते. शनिवारीदेखील असे वातावरण राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविली आहे. ढगाळ वातावरण असले तरी राज्यात थंडीचा जोर कायम राहणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
चिकलठाणा वेधशाळेने कळविलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. औरंगाबाद शहरात थंडीचा जोर हळूहळू वाढतो आहे. शुक्रवारी दिवसभरात कमाल तापमान ३०.४ तर किमान तापमान १६.९ डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले आहे. किमान तापमानामध्ये दोन दिवसांच्या तुलनेत घट होत झाल्यामुळे थंडीचा जोर वाढतो आहे. शहर व परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. गार हवा सुटल्यामुळे थंडीही जाणवत होती.
प. बंगालच्या उपसागरातील व दक्षिणेकडील हिंद महासागरातील सध्याच्या हवामानाची स्थिती लक्षात घेतली तर ५ नोव्हेंबरदरम्यान पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे.
जानेवारी २०१७ पर्यंत ‘ला निना’ ची परिस्थिती जवळजवळ ७० टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने यावर्षी कडाक्याच्या थंडीला सामोरे जावे लागणार आहे. याचा फायदा गहू व हरभरा या पिकांसाठी पोषक हवामान असल्याने या पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्यावर होईल.