मराठा क्रांती मोर्चाच्या बोंबाबोंब आंदोलनाने दणाणले क्रांतीचौक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:02 IST2018-03-01T19:00:51+5:302018-03-01T19:02:05+5:30
चार महिन्यांपासून केवळ चर्चेचे गु-हाळ चालविणार्या या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने विविध जी.आर.ची ओळी केली आणि सरकारच्या नावाने बोंबा ठोकल्या.

मराठा क्रांती मोर्चाच्या बोंबाबोंब आंदोलनाने दणाणले क्रांतीचौक
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाने ५८ मोर्चे काढल्यानंतरही शासनाने वेळ काढू धोरण स्विकारल्याने आजपर्यंतच्या एका ही जी.आर.ची अंमलबजावणी करण्यात आली नाही. चार महिन्यांपासून केवळ चर्चेचे गु-हाळ चालविणार्या या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने विविध जी.आर.ची ओळी केली आणि सरकारच्या नावाने बोंबा ठोकल्या.
आज दुपारी १२ वाजता क्रांतीचौकात मराठा क्र ांती मोर्चाच्यावतीने निदर्शने आणि शासनाच्या जी.आर.च्या होळीचे आयोजन करण्यात आले. राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात काढलेल्या विविध जी.आर. ची अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे या जी.आर.ची होळी करण्यात येत असल्याचे यावेळी पदाधिकार्यांनी जाहिर केले. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्याचे केवळ आश्वासने दिली. जी.आर.चे गाजर दाखविणार्या राज्यशासनाच्या निषेध करणार्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणला. शिवजयंती ही १९ फेब्रुवारी रोजीच साजरी करण्याचा ठराव क्रांती मोर्चाने घेतला. या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शासनाने दिले. मात्र शासनाने याविषयी अद्यापही निर्णय घेतला नाही. उलट सत्ताधारी युती तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत आहे. मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी स्वतंत्र आय.एस. दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, ही मागणीही शासनाने मान्य केली नाही. राज्यशासनाची प्रतिकात्मक होळी करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या हातातून पोलिसांनी होळीचे सामान हिसकावून घेतले. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.
या आंदोलनात आप्पासाहेब कुढेकर, राजेंद्र जंजाळ, मनोज गायके, सुरेश वाकडे,रविंद्र काळे पाटील, रमेश गायकवाड, विजय काकडे, गजानन पाटील, सतीश वेताळ, योगेश मसलगे, सरोज मसलगे, मुकेश सोनवणे, रंगनाथ खेडेकर,अॅड.स्वाती नखाते, रेखा वाहटुळे, सोनवणे रमेश केरे पाटील, अंकत चव्हाण, सुनील कोटकर, रविंद्र तांगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी,पोलीस निरीक्षक अनील आडे, पोलीस निरीक्षक राजर्षी आडे,उपनिरीक्षक धर्मराज देशमुख, संजय बनकर आदींनी बंदोबस्त ठेवला.