मराठा समाजाचा उद्या मूकमोर्चा
By Admin | Updated: August 25, 2016 01:00 IST2016-08-25T00:50:07+5:302016-08-25T01:00:37+5:30
उस्मानाबाद : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ व इतर विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी उस्मानाबाद येथील जिजाऊ

मराठा समाजाचा उद्या मूकमोर्चा
उस्मानाबाद : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ व इतर विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी उस्मानाबाद येथील जिजाऊ चौकातून महा-मूकमोर्चा काढण्यात येणार आहे़ या मूकमोर्चात लाखो मराठा समाज बांधव सहभागी व्हावेत, यासाठी गावो-गावी आयोजित बैठकांना प्रतिसाद मिळत आहे़
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपींविरूध्द तातडीने दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना फासावर लटकवावे, मागील दहा वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या मराठा समाजातील झाल्या असून, आत्महत्या केलेल्या मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत समावून घ्यावे, ईबीसीची सवलत मर्यादा सहा लाखापर्यंत वाढवावी यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे़ या मूकमोर्चात जिल्ह्यातील लाखो समाजबांधव सहभागी व्हावेत, यासाठी मागील पंधरा-वीस दिवसांपासून गावो-गावी बैठका घेण्यात येत आहेत़ समाजातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, विधीज्ञ, प्राध्यापक, शिक्षकांसह शेतकरी, शेतमजुरांसह महिला, युवक, युवतींनी मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी बैठकांमधून आवाहन करण्यात येत आहे़ याशिवाय व्हाट्सअप, फेसबूक आदी सोशल मीडियाचा वापर करून मूक मोर्चाबाबत जनजागृती करण्यात येत आहे़ उस्मानाबादसह तालुक्याच्या ठिकाणी मोर्चाचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत़ मोर्चात सहभागी होणाऱ्या महिलांसह नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, दोन रूग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे़ तर मोर्चातील गैरसोयी टाळण्यासाठी २ हजार स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, या मोर्चात मराठा समाजातील दोन लाखावर महिला-पुरूष, युवक-युवती सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी केला आहे़ (प्रतिनिधी)