मापात पाप...!
By Admin | Updated: July 26, 2014 00:38 IST2014-07-26T00:01:23+5:302014-07-26T00:38:36+5:30
बापू काकडे, केज गोरगरिबांसाठी वितरण व्यवस्थेमार्फत येणारे धान्य गोदामांमध्येच काढून घेतले जाते. मापात पाप करुन धान्याचा काळाबाजार राजरोस सुरु आहे.
मापात पाप...!
बापू काकडे, केज
गोरगरिबांसाठी वितरण व्यवस्थेमार्फत येणारे धान्य गोदामांमध्येच काढून घेतले जाते. मापात पाप करुन धान्याचा काळाबाजार राजरोस सुरु आहे. नेकनूर, चौसाळ्यातील धान्य घोटाळ्याने नायब तहसीलदारांसह तिघांचे बळी घेतल्यानंतरही काळ्याबाजाराला ‘ब्रेक’ लागलेला नाही. ‘पोते फोडा अन् तांदूळ काढा...’ असा हा ‘गोरखधंदा’ गोदामातीलच कर्मचाऱ्यांनी मांडल्याचे ‘लोकमत’ने केज येथे केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघड झाले.
जिल्ह्यात रेशनचे २१०० दुकान आहेत. या दुकानांमधून गोरगरीब लोकांना स्वस्त दरात धान्य पुरविले जाते. केज येथे धान्य साठविण्यासाठी गोदाम बांधलेले आहे. या गोदामात धान्याचे पोते ठेवलेले आहेत. हे पोते फोडून त्यातून साधारण पाच किलोपर्यंतचे धान्य गोदामातच काढून घेतले जाते. हा काळाबाजार बिनदिक्कत सुरु आहे. पाच किलोपर्यंतचे धान्य काढून घेतल्यावर पोते पुन्हा शिवून घेतले जाते. धान्य मोजण्यासाठी मापकाटाही लावण्यात आला आहे. गोदामातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पोत्यांतून धान्य काढले जाते. त्याशिवाय एकही पोते बाहेर येत नाही, असे स्टींगमध्ये स्पष्ट झाले आहे. याची चित्रफीतही ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.
असे केले स्टींग...
‘लोक मत’ प्रतिनिधी धान्य वाहून नेणाऱ्या वाहनात प्रवासी बनून गेला. केबिनमध्ये बसून त्याने गोदामातील काळाबाजार चित्रित केला. धान्यावर इतक्या राजरोसपणे डल्ला मारला जातोय की, गोदामकिपर, गोदामरक्षक, हमाल या सर्वांचा यात सहभाग असल्याचे दिसून आले.
काय आढळले?
स्टींग आॅपरेशनमधून समोर आलेला प्रकार धक्कादायक आहे. रेशनच्या धान्यावर हात मारताना प्रत्येकजण आपापली जबाबदारी अतिशय काटेकोरपणे पार पडताना दिसला. पोते उचलणारे हमाल ते धान्य काढून घेणारा कर्मचारी सफाईदारपणे मापात पाप करतात. पोते उचलून काट्याजवळ मांडले जाते. ते फोडून टोपल्याद्वारे धान्य काढून घेतात. त्यानंतर पोते बाजूला सरकून ते शिवून घेतले जाते. त्यानंतर पोते बाहेर नेले जाते. असा सारा काळाबाजार येथे सुरु असताना त्यांना हटकणारे कोणीच दिसून आले नाही.
तपासण्या कागदावर
धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी शासन एकीकडे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तहसीलदारांनी प्रत्येक महिन्याकाठी दहा टक्के दुकानांची तपासणी करण्याचे आदेश आहेत; पण तहसीलदार दुकान, गोदामांकडे फिरकायला तयार नाहीत. परिणामी धान्य माफियांना मोकळे रान मिळाले असल्याचे दिसून येत आहे.
आम्हाला कुणाची भीती ?
केज येथील शासकीय गोदामामध्ये अशा प्रकारे राजरोसपणे गोरगरीबांच्या तोंडातील धान्य पळविले जाते़ पहिल्या छायाचित्रात पोत्यातील धान्य काढून घेताना़ दुसऱ्या छायाचित्रात धान्य काढून घेतल्यानंतर पोते शिवून बाहेर काढताना तर शेवटच्या छायाचित्रात धान्य काढण्यासाठी पोते अशा प्रकारे फाडले जात होते़