मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 15:43 IST2017-07-29T15:43:24+5:302017-07-29T15:43:31+5:30
मॉर्निंग वॉक करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंळसूत्र अज्ञात दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले.

मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि.२९ : मॉर्निंग वॉक करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंळसूत्र अज्ञात दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले. ही घटना वेदांतनगर येथील पगारीया रेसिडेन्सीजवळ शुक्रवारी (दि. २८) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
याविषयी अधिक माहिती देताना वेदांतनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाहिद सिद्दीकी यांनी सांगितले की, सुजाता मदनलाल पगारीया(५३,रा. वेदांतनगर) या नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी घराच्या परिसरात मॉर्निंग वॉक साठी गेल्या होत्या. त्या पगारीया रेसिडेन्सीपासून जात असताना विनानंबरच्या दुचाकीवरुन दोन तरुण त्यांच्यासमोरून गेले आणि लागलीच पुन्हा त्यांच्या विरूद्ध दिशेने परत आले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या एका जणाने सुजाता यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका देऊन तोडून घेतले. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले.
यानंतर, त्यांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली व वेदांतनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. मंगळसूत्र चोरट्यांपैकी दुचाकीचालकाने हेल्मेट घातलेले होते तर दुस-याने डोक्यावर टोपी घालुन चेहरा रुमालाने झाकला होता. यामुळे चोरट्यांचे चेहरे पगारिया यांना दिसले नाहीत.
निकृष्ट दर्जाचे सीसीटिव्ही कॅमेरे
घटनास्थळाच्या परिसरातील अनेक बंगले आहेत. यातील काही बंगल्याच्या मालकांनी सीसीटिव्ही लावलेले आहेत. परंतु; हे कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने चोरटे यात कैद होऊन हि दिसत नाहीत. शिवाय काही बंगल्याच्या केवळ आवारातच सीसीटिव्ही आहेत बाहेर नाहीत.