पीएमडीच्या मालमत्तेवर अनेक जणांचा दावा

By Admin | Updated: July 1, 2014 00:12 IST2014-06-30T23:50:21+5:302014-07-01T00:12:15+5:30

पाथरी : पीएमडी या मल्टी सर्व्हिस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना दुप्पट-तिप्पट आणि पाचपट रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

Many people claim PMD's property | पीएमडीच्या मालमत्तेवर अनेक जणांचा दावा

पीएमडीच्या मालमत्तेवर अनेक जणांचा दावा

पाथरी : पीएमडी या मल्टी सर्व्हिस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना दुप्पट-तिप्पट आणि पाचपट रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. गोळा करण्यात आलेल्या रकमेतून पीएमडी कंपनीने संचालक आणि इतर नातेवाईकांच्या नावे शहर आणि तालुक्यामध्ये खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेवर आता फसवणूक झालेले ग्राहक आता दावा करू लागले आहेत. अनेक ठिकाणी कंपनीच्या जागेवर वाद्ग्रस्त जागा म्हणून बोर्डही लावण्यात आले आहेत.
पाथरी तालुक्यातील खेडुळा येथील मुंजाभाऊ डुकरे याने दोन वर्षापूर्वी पीएमडी (पॉवर मनी ड्रीम) मल्टी सर्व्हिस या नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना दुप्पट, तीनपट आणि पाचपट अल्पावधीमध्ये रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. अल्पावधीतच या कंपनीने परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शाखा उघडून हजारो ग्राहकांचे जाळे एजंटमार्फत तयार केले. बँकेने पाथरी, मानवत या दोन तालुक्यात तीन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडले. या खात्यामधून गुंतवणूकदारांच्या पैशाचे व्यवहार केले. सुरुवातीला फिक्स डिपॉझिट करून काही गुंतवणुकदारांना सुरुवातीच्या कालावधीमध्ये रक्कम परत केली. त्यानंतर पुढील दोन वर्षाचे धनादेश दिले. अल्पावधीत मोठी साखळी तयार झाल्याने या कंपनीने करोडो रुपये गोळा केले. कंपनीच्या आजपर्यंतच्या व्यवहारामध्ये जवळपास १०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ग्राहकांना पैसे परत मिळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून ग्राहकांनी कंपनीकडे पैशाचा तगादा लावला. लवकरच परत देतो असे सांगून या कंपनीचे प्रवर्तक मुंजाजी डुकरे याने अनेक ग्राहकांना झुलवत ठेवले. त्यांच्या सोबत बैठका घेऊन पैसे देण्याचे खोटे आश्वासनही दिले. दरम्यानच्या काळात या कंपनीने पाथरी येथील विविध कार्यालये बंद करून पोबारा केला. त्यानंतर कंपनीच्याच काही हितचिंतकाने पोलिसांत तक्रार देण्याबाबत शक्कल लढविली. ग्राहकांचा ससेमिरा टाळण्यासाठी कंपनीने हा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)
जिल्ह्याबाहेरही अनेक शाखा
ग्राहकांची फसवणूक करून करोडो रुपयांची माया जमविल्यानंतर भाजीपाला खरेदी करावा या प्रमाणे या कंपनीच्या मालकाने शहरात, तालुक्यात आणि जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे. पाथरीत खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेवर फसवणूक झालेल्या काही ग्राहकांनी ही मालमत्ता वादग्रस्त असल्याचे बोर्डही परस्पर लावले आहेत तर अनेक या मालमत्तेवर दावे सांगू लागले आहेत. या कंपनीला ग्राहक जोडून देणारे एजंट आणि कंपनीचे संचालक याची साखळी असल्यानेच हजारो ग्राहकांची फसवणूक झाली. शहरामध्ये दिवसेंदिवस फसवणूक झालेले ग्राहक चकरा मारत आहेत.
स्वतंत्र चौकशी करा
खोटे आमिष दाखवून करोडो रुपयांची मालमत्ता पीएमडीने जमा करून ग्राहकांची फसवणूक झाली. ग्राहकांच्या तक्रारींची पोलिसांनी वेळेत दखल घेतली नाही. कंपनीचे मालक आणि संचालक फरार होण्यास यशस्वी ठरले आहेत. या प्रकरणी आता स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी फसवणूक झालेले ग्राहक करू लागले आहेत.

Web Title: Many people claim PMD's property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.