मांगीरबाबा यात्रा : म्हणणे मांडण्यासाठी देवस्थानला खंडपीठाने दिला वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 21:10 IST2019-01-27T21:10:33+5:302019-01-27T21:10:44+5:30
शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील गळ टोचणी प्रथेसह इतर अनिष्ट रूढींविरुद्ध दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपले म्हणणे सादर करण्यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने वेळ मागून घेतला.

मांगीरबाबा यात्रा : म्हणणे मांडण्यासाठी देवस्थानला खंडपीठाने दिला वेळ
औरंगाबाद : शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील गळ टोचणी प्रथेसह इतर अनिष्ट रूढींविरुद्ध दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान आपले म्हणणे सादर करण्यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने वेळ मागून घेतला. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. ए.जी. अवचट यांच्यासमोर शुक्रवारी (दि.२५) सुनावणी झाली. या याचिकेवर आता १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे.
लालसेनेचे अध्यक्ष गणपत भिसे यांनी या अनिष्ट रूढींविरुद्ध खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. शेंद्रा येथील मांगीरबाबा येथे दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मांगीरबाबा यात्रा सुरू होते. यात्रेत नवस फेडण्यासाठी कोंबडे, बकरे कापून व स्वत:च्या अंगामध्ये लोखंडी गळ (हूक) टोचून घेण्यासारखे अघोरी प्रकार केले जातात. या अनिष्ट आणि अघोरी प्रथेमुळे आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे अनेक भक्तांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर प्रथा बंद करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. अंगद कानडे काम पाहत आहेत.