मांडवीचे चार पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
By Admin | Updated: May 18, 2014 01:25 IST2014-05-18T01:15:06+5:302014-05-18T01:25:40+5:30
मांडवी : आरोपीने रात्रीला सोबतचे पोलिस खाण्या-पिण्यात गुंतल्याचे पाहून हातकडीतून सुटका करुन पोबारा केल्याची घटना पिंपळगाव फाटा येथे घडली.

मांडवीचे चार पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
मांडवी : बलात्कार व अॅट्रॉसिटी अॅक्टच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या आरोपीने रात्रीला सोबतचे पोलिस खाण्या-पिण्यात गुंतल्याचे पाहून हातकडीतून सुटका करुन पोबारा केल्याची घटना पिंपळगाव फाटा येथे घडली. या घटनेला जबाबदार धरुन संबंधित चार पोलिस कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले, अशी माहिती सपोनि व्ही. व्ही. खिल्लारे यांनी दिली. येथील दत्तनगरमध्ये राहणार्या निलेश विजय राठोड यांनी आदिवासी प्रवर्गात मोडणार्या एका मुलीला फूस लावून पळवून नेले. त्याची रितसर तक्रार पीडित मुलीच्या कुुटुंबाने ७ जुलै २०१३ ला मांडवी पोलिस ठाण्यात दिली. तेव्हापासून हा आरोपी फरार होता. गेल्या दहा महिन्यांपासून तालुकास्तरावरील विशेष पोलिस पथकांनी तपासाची दिशा ठरवून भ्रमणध्वनीच्या मनोरा संकेतावरुन आदिलाबाद जिल्ह्यातील कजरला या गावात सापळा रचून १३ मे रोजी आरोपीला पकडले. पुढील कार्यवाहीसाठी सदर आरोपीला मांडवी पोलिसाकडे सोपविले. त्यांनी तपास प्रक्रिया चालू केली. १५ मे रोजी किनवटवरुन मांडवीकडे परत येत असताना पिंपळगाव फाटा येथे नेहमी प्रमाणे आरोपीला घेवून हे पोलिस खाण्या-पिण्यासाठी येथे थांबले. हळूहळू पार्टीचा रंग चढत गेला अन् हे हेरलेल्या त्या चतूर आरोपीने आपला डाव साधला आणि अंधाराचा फायदा घेत शेत शिवारातून पसार झाला. आपल्याला गुंगारा देऊन आरोपीने पलायन केल्याचे समजताच जमादार आनंद नरवाडे, रामदास ढोले, संजय रांजणे, गजानन धुर्वे यांचे अवसान गळाले आणि हात हलवत ठाण्यात परतले. ही घटना सर्वत्र पसरली. या घटनेला जबाबदार धरुन चारही जणांना निलंबित केले आहे. (वार्ताहर)