क्रीडा कार्यालयाचा गलथान कारभार !

By Admin | Updated: August 21, 2014 01:22 IST2014-08-21T00:37:52+5:302014-08-21T01:22:26+5:30

सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये मंगळवारपासून बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात येत आहेत. मात्र या स्पर्धेत कुठलेही नियोजन नसल्याने आलेल्या खेळाडूंना अनेक

The management of the office of the office! | क्रीडा कार्यालयाचा गलथान कारभार !

क्रीडा कार्यालयाचा गलथान कारभार !




सोमनाथ खताळ , बीड
येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये मंगळवारपासून बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात येत आहेत. मात्र या स्पर्धेत कुठलेही नियोजन नसल्याने आलेल्या खेळाडूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे बॉक्सिंग स्पर्धेत एखाद्या खेळाडूला इजा झाली तर तात्काळ उपचार करण्यासाठी कुठलीही काळजी या कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जखमी खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परीषद, बीड यांच्या मार्फत जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेला मंगळवारी सुरूवात करण्यात आली. स्पर्धेला सुरूवात होण्याच्या दिवसापासूनच या स्पर्धेचे ढिसाळ नियोजन असल्याचे पहावयास मिळाले. सकाळी ११ वाजता स्पर्धेला सुरूवात होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात या स्पर्धेला दुपारी दोनच्या सुमारास सुरूवात झाली. स्पर्धेला उशिरा सुरूवात होण्याला केवळ क्रीडा कार्यालयच नव्हे तर सहभागी खेळाडू व त्यांचे प्रशिक्षकही तेवढेच जबाबदार होते. कारण कोणताही संघ वेळेवर हजर झालेला नव्हता. क्रीडा कार्यालयाकडून या उशिरा सहभागी होणाऱ्या शाळांची पाठराखण केल्यामुळे या शाळा व खेळाडू नेहमीच स्पर्धेला उशीर करीत असल्याचेही येथील काही सुत्रांनी सांगितले.
मंगळवारी १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या बॉक्सींग स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सुमारे ७३ खेळाडू सहभागी झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या या स्पर्धा सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होत्या. दिवसभर अन्न पाण्यावाचून हे खेळाडू स्पर्धेत खेळत होते. दुपारच्या वेळेसच जेवन केले असल्याचे एका खेळाडूने सांगितले.
बुधवारी काय आढळले..
बुधवारी दुपारी एकच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकूलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आम्ही प्रवेश केला. यावेळी काही खेळाडू सराव करीत होते. येथील काही संयोजकांना विचारले असता त्यांनी आणखी स्पर्धेला सुरू होण्यासाठी भरपूर वेळ असल्याचे सांगितले. ११ ला सुरू होणारी स्पर्धा दुपारी दोन पर्यंतही सुरूच झाली नव्हती, यावरून क्रीडा कार्यालयाचे स्पर्धेकडे किती दुर्लक्ष आहे, हे दिसून येते.
‘मॅट’ सोडून दुसऱ्याच
जागेवर घेतली स्पर्धा
बॅडमिंटन हॉलमध्ये बॉक्सिंग स्पर्धेसाठी मंगळवारी मुलांना पायाखाली मॅट होती. बुधवारी मात्र ही मॅट चक्क कोपऱ्यात फेकून देण्यात आली होती व आलेल्या खेळाडूंना जमिनीवर (मऊ जागेत) खेळविल्यामुळे त्यांचे पाय घसरत होते. त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्ध्याला मारताना अडचणी येत होत्या. अनेकांना यामुळे आपला पॉर्इंटही गमवावा लागला.
नियमांचा अभाव
आलेल्या खेळाडूंना बॉक्सिंग स्पर्धेचे काय नियम असतात? याबाबत कुठलीही माहिती नसावी, असे त्यांच्या बोलण्यावरुन वागण्यावरुन दिसून येत होते.
स्पर्धेच्या ठिकाणी ‘धिंगाणा’
बुधवारी बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धा सुरू असताना संयोजकांचा व क्रीडाप्रेमींचा मोठ्या प्रमाणात धिंगाणा सुरू होता. याला आळा बसविण्यासाठी कुठलाही सुरक्षा रक्षक येथे उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे खेळाडूंमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण होते.
व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात
काही दिवसापूर्वीच व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये क्रीडा अधिकाऱ्यांच्या वतीने योग्य ते नियोजन करण्यात आल्याने खेळाडूंचे हाल झाले नव्हते.
याबाबत क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ म्हणाल्या, स्पर्धेमध्ये खेळाडूंचा अपघात झाल्यास उपचाराचे साहित्य असणे आवश्यक आहे, तशा सूचनाही संबंधित विभागाला दिलेल्या आहेत, त्यांनी याची काळजी घेतलेली नाही. मी स्वत: पाहणी केली असून, याच्यानंतर खेळाडूंचे कुठलेही हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. ढिसाळ नियोजनाची चुक मान्य आहे.

Web Title: The management of the office of the office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.