माळ्याची उमरी येथे धाड
By Admin | Updated: May 29, 2014 00:20 IST2014-05-29T00:13:50+5:302014-05-29T00:20:46+5:30
दैठणा : माळ्याची उमरी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून नगदी चौदा हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करुन सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले़

माळ्याची उमरी येथे धाड
दैठणा : माळ्याची उमरी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून नगदी चौदा हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करुन सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले़ ही कारवाई २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ माळ्याची उमरी येथे राजरोसपणे जुगार खेळला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांना मिळाली होती़ या माहितीवरून पोलिस निरीक्षक राजेंद्र शहाणे, फौजदार राजेश्वर जुकटे, हनुमान मरगळ, विजय कनाके, आरेफ कुरेशी, प्रकाश गायकवाड, ठोंबरे यांनी सापळा रचून तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना धाड टाकली़ यावेळी दत्तराव बाबाराव गोरे, उत्तम गोरे, दत्ता भुजंग लबडे, नारायण रामभाऊ गोरे, ज्ञानोबा श्रीपत माने, उत्तम बाबूराव माळे, नारायण सुदाम गोरे (सर्व रा़ उमरी) यांना रंगेहाथ पकडले़ त्यांची झडती घेतली असता रोख १४ हजार ३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले़ वरील सात जणांविरूद्ध दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यामुळे जुगार खेळणारांचे धाबे दणाणले आहेत़ दैठणा पोलिस ठाण्याअंतर्गत राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत़ पोलिस प्रशासन कागदोपत्री कारवाई दाखविण्यासाठी मोहीम राबविते की काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे़ पोलिसांनी अवैध धंदे बंद करण्याचे मनावर घेतल्यास जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू राहणार नाहीत़ मात्र पोलिसांच्या आशीर्वादामुळे अवैध धंदे जिल्ह्यामध्ये सुरू आहेत़ पोलिसांची ही कारवाई अशीच चालू रहावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)पोखर्णी व उमरी या दोन ठिकाणी बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करीत असताना दैठणा पोलिसांनी धाड टाकून १ हजार १५० रुपयांची दारू जप्त केली़ ही कारवाई २७ मे रोजी दैठणा पोलिसांनी केली़ दैठणा पोलिस ठाण्याचे पोकॉ संजय अळनुरे यांनी पोखर्णी फाट्यावर रामेश्वर बालाजी भरड (वय २०, रा़ कोडंबवाडी) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून बेकायदेशीररित्या देशी दारूच्या बाटल्या सापडल्या़ ज्याची किंमत ४५० रुपये एवढी असल्याचे समजते़ दुसर्या घटनेत उमरी येथे धाड टाकली असता संतोष लिंबाजी कांबळे यांच्याकडून ७२० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली़ या प्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास दैठणा पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत़ पोलिसांच्या आशीर्वादामुळेच ग्रामीण भागात अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत़