जनतेच्या पैशांचे आॅडिट व्हावे

By Admin | Updated: June 2, 2014 01:33 IST2014-06-02T01:12:25+5:302014-06-02T01:33:08+5:30

औरंगाबाद : सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा सामान्य जनतेने गाळलेल्या घामाचा असतो. सरकारी योजनेच्या नावाखाली या पैशांचा वापर भांडवलदार करून नफा कमवत आहेत.

To make public money audit | जनतेच्या पैशांचे आॅडिट व्हावे

जनतेच्या पैशांचे आॅडिट व्हावे

औरंगाबाद : सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा सामान्य जनतेने गाळलेल्या घामाचा असतो. सरकारी योजनेच्या नावाखाली या पैशांचा वापर भांडवलदार करून नफा कमवत आहेत. हेच बडे भांडवलदार कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून बँकांना पर्यायाने सरकारला लुटत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सरकारी पैशांचे सार्वजनिक आॅडिट होणे आवश्यक आहे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी केली. आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या (एआयबीओएमईए) सहाव्या अधिवेशनाच्या रविवारी दुसर्‍या दिवशी सकाळच्या सत्रात पी. साईनाथ यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सी. एच. वेंकटाचलम यांची प्रमुख उपस्थिती होती. पी. साईनाथ यांनी जागतिक बँकिंगची आणि देशातील बँकिंग व्यवस्थेची अभ्यासपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, जगात मंदी असताना भारतात राष्ट्रीयीकृत बँकांनी अर्थव्यवस्था टिकवून ठेवलीच नव्हे तर देशाला आर्थिक संकटापासून वाचविले. मात्र, आता या राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण करा, असा अहवाल नायक समितीने दिला आहे. नायक कमिटीचा अहवाल संपूर्णपणे चुकीचा आहे. हा अहवाल फेटाळण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बड्या उद्योगपतींना दिलेले कर्ज लाखो कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. हे कर्ज वसूल करताना बँकांच्या नाकीनऊ येत आहे. सामान्य ग्राहकांनी बँकेत विश्वासाने ठेवलेल्या पैशांचा भांडवलदार गैरवापर करून स्वत:ची संपत्ती वाढवत आहेत. हमाल, कष्टकरी, कर्मचारी, सेवानिवृत्तांच्या घामाच्या पैशांवर भांडवलदारांनी डल्ला मारला आहे, असे साईनाथ म्हणाले. सरकारी पैसा जनतेच्या कल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे. भांडवलदारांच्या फायद्यासाठी नव्हे. यासाठी सरकारी पैशांचे सार्वजनिक आॅडिट झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. व्यासपीठावर एआयबीओएमईएफचे अध्यक्ष विश्वास उटगी, महासचिव देवीदास तुळजापूरकर, स्वागत समितीचे अध्यक्ष जगदीश भावठाणकर आदी उपस्थित होते. अधिवेशनास देशभरातून महाराष्ट्र बँकेचे ५०० कर्मचारी उपस्थित होते. ग्राहक व कर्मचार्‍यांना येणार्‍या प्रश्नांवर अधिवेशनात दिवसभर चर्चा झाली व दोन दिवसांच्या अधिवेशनाची सांगता झाली. इन्कम टॅक्स रिटर्न आॅनलाईन करा देशात इन्कम टॅक्स भरणार्‍यांची संख्या कमी आहे. कारण इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी माहिती लपविली जाते. याचा शासनाच्या तिजोरीवर मोठा परिणाम होतो. यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न आॅनलाईन केले पाहिजे. यात पंतप्रधानांपासून सर्वांचे इन्कम टॅक्स रिटर्न आॅनलाईन दिसले पाहिजे. तसेच या करप्रणालीत पारदर्शकता आणली पाहिजे. यासाठी एआयबीईए संघटनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पी. साईनाथ यांनी केले.

Web Title: To make public money audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.