'बक्कळ नफा कमवून देतो, मी म्हणतो तसे करा'; खाद्यतेल विक्रेत्याला सेल्समनने १२ लाखाला फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 02:18 PM2021-04-03T14:18:17+5:302021-04-03T14:23:27+5:30

व्यवसाय वाढवून देण्याच्या आमिषाने खाद्यतेल विक्रेत्याची १२ लाख ६९ हजारांची फसवणूक

'Make a lot of money, do as I say'; The salesman defrauded the edible oil seller for Rs 12 lakh | 'बक्कळ नफा कमवून देतो, मी म्हणतो तसे करा'; खाद्यतेल विक्रेत्याला सेल्समनने १२ लाखाला फसवले

'बक्कळ नफा कमवून देतो, मी म्हणतो तसे करा'; खाद्यतेल विक्रेत्याला सेल्समनने १२ लाखाला फसवले

googlenewsNext
ठळक मुद्देकृष्णा विजय सोनपेठकर (रा. अंबर हिल, जटवाडा रोड, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

औरंगाबाद: खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय नव्याने सुरू केलेल्या व्यापाऱ्याला व्यवसाय वृद्धीसाठी मदत करण्याचे आमिष दाखवून विश्वासघात करत १२ लाख ६९ हजार ८६५ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार समोर आल्यावर आरोपीविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.कृष्णा विजय सोनपेठकर (रा. अंबर हिल, जटवाडा रोड, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार विनोद शरदराव मुळे यांची सिडकोत ट्रेडिंग कंपनी आहे. जालना येथील तेल उत्पादक कंपनीची त्यांनी एजन्सी घेतली. कंपनीकडून आलेला माल ते शहरात विक्री करतात. त्यांनी एजन्सी घेतल्यानंतर आरोपी त्यांना येऊन भेटला आणि तो कंपनीचा अधिकृत सेल्समन असल्याचे त्याने सांगितले. तुमच्या व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करतो. तुम्हाला खाद्यतेलाच्या ऑर्डर मिळवून देईन, असे आरोपीने सांगितले. त्यानंतर त्याने मुळे यांना २२ आणि २३ ऑगस्ट २०२० रोजी ५ लाख ८५ हजार ८२५ रुपये किमतीच्या दोन ऑर्डर दिल्या. हा माल जीपमध्ये भरून तो घेऊन गेला. या मालाचे बिल त्याच्या नावे फाडा. पैसे जमा होताच सात दिवसांत आणून देतो, असे सांगितले. 

सोनपेठकर हा कंपनीचा अधिकृत सेल्समन असल्याने व मुळे यांनी कंपनी मालकाकडे खात्री केल्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर या मालाची रक्कम देण्यास आरोपी टाळाटाळ करू लागला. त्यानंतर त्याने काही ऑर्डर दिल्या आणि त्याचे पैसे रोख स्वरूपात दिले. त्यामुळे पैसे तो आणून देईल, असे मुळे यांनी गृहीत धरले. दरम्यान, त्याने ग्रामीण भागातील अनेक दुकानदारांना मुळे यांच्याकडून तेल पाठविले. या तेलाची रक्कम तब्बल ११ लाख ३४ हजार ४० रुपये झाली. ही रक्कम आणि आधीचे पैसे जमा होताच तुम्हाला देतो, असे तो म्हणाला. मुळे यांनी पैशांसाठी तगादा लावल्यावर आरोपीने त्यांच्या खात्यात ऑनलाइन ४ लाख ४९ हजार ९०० रुपये जमा केले. 

२२ ऑगस्ट २०२० आणि २३ ऑगस्ट २०२० रोजी पाठविलेल्या मालाच्या बिलापैकी ही रक्कम असल्याचे त्याने मुळे यांना सांगितले. या बिलातील उर्वरित १ लाख ३५ हजार ८२५ रुपये आणि अन्य रक्कम लवकरच देतो, असे तो म्हणाला. दरम्यान, त्याने धारूर येथील एका एजन्सीकडून खाद्यतेलाची ऑर्डर घेतली आणि त्यांना मुळे यांच्या खात्यावर २ लाख रुपये जमा करायला लावले. मुळे यांनी या रकमेविषयी विचारले असता त्याने अंधारी येथील आनंद ट्रेडिंग कंपनीला यापूर्वी पाठविलेल्या मालाची ही रक्कम असल्याचे खोटे सांगितले.

आरोपीची भामटेगिरी उघड
दरम्यान, धारूर येथील दुकानदार माल न मिळाल्यामुळे पोलीस घेऊन तक्रारदार यांच्या दुकानात आला तेव्हा आरोपी सोनपेठकरची भामटेगिरी उघड झाली. मुळे यांनी त्यांना त्यांच्या रकमेचा धनादेश देऊन परत पाठविले आणि आरोपीविरुद्ध सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: 'Make a lot of money, do as I say'; The salesman defrauded the edible oil seller for Rs 12 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.