मका हब उभारणीला सुरुवात
By Admin | Updated: May 12, 2014 00:38 IST2014-05-12T00:29:22+5:302014-05-12T00:38:07+5:30
औरंगाबाद : मक्याच्या क्षेत्रवाढीचा उच्चांक गृहीत धरून मका प्रक्रिया व निर्यातीला चालना देण्यासाठी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० एकर जागेवर ‘मका हब ’ उभारण्यात येणार आहे.

मका हब उभारणीला सुरुवात
औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील मक्याच्या क्षेत्रवाढीचा उच्चांक गृहीत धरून मका प्रक्रिया व निर्यातीला चालना देण्यासाठी जाधववाडीतील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० एकर जागेवर ‘मका हब ’ उभारण्यात येणार आहे. यासाठी पणन मंडळ संरक्षक भिंत उभारत आहे. राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी बाजार समिती म्हणून औरंगाबाद जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. याच बाजार समितीच्या पूर्वेस ५० एकर क्षेत्रावर ‘मका हब’ उभारण्यात येणार आहे. याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. यासंदर्भात जानेवारी-२०१४ मध्ये प्रथम पुण्यात वरिष्ठ कृषी अधिकार्यांची व नंतर औरंगाबादेत ‘महाराष्ट्र अॅडव्हान्टेज एक्स्पो’च्या पार्श्वभूमीवर उद्योजक आणि कृषी अधिकार्यांची बैठक झाली. यात मका हबसाठी जाधववाडीतील जागा निश्चित झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली होती. प्रारंभी कृषी पणन मंडळाने जाधववाडीत २० एकर जागा घेतली होती. त्यानंतर आणखी ३० एकर जागा वाढवून देण्यात आली. अशी एकूण ५० एकर जागा पणन मंडळाला उपलब्ध झाली आहे. या जागेवर मका हब उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम रिकाम्या जागेला संरक्षक भिंतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. संरक्षक भिंत बांधताना मध्ये मध्ये सिमेंटचे खांब (पिलर) तयार केले जात आहेत व भिंत विटांची केली आहे. मराठवाड्यात केशर आंब्याचे क्षेत्र व उत्पादन लक्षात घेऊन सर्वप्रथम या जागेवर आंबा मार्केट उभारण्यात येणार होते. त्यानंतर निर्णय बदलून तेथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मका हब उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिथे पिकते तिथेच प्रक्रिया औरंगाबाद विभागात एकूण साडेतीन लाख हेक्टरवर मक्याची पेरणी होते. जिल्ह्यात सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव आणि कन्नड तालुक्यांत तसेच जालना जिल्ह्यातील भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. सुधारित वाण आणि नवीन तंत्रज्ञानामुळे मका पिकाची उत्पादकता वाढविण्यात येथील शेतकर्यांना बर्यापैकी यश आले आहे. औरंगाबाद विभागात मक्याचे एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मका क्षेत्रवाढीचा गेल्या पाच वर्षांतील चढता आलेख पाहिला तर दरवर्षी मका लागवड क्षेत्रात भरच पडत आहे. मका क्षेत्र वाढले तरीही मका प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकर्यांना बाजार व्यवस्थेवरच अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी जिथे पिकते तिथेच प्रक्रिया झाली तर मक्याला जास्त भाव मिळेल या हेतूने मका हबची उभारणी जाधववाडीत होणार आहे. बिझनेस प्लॅनसाठी निविदा प्रक्रिया सुरू ‘आत्मा’चे उपसंचालक संतोष आळसे यांनी सांगितले की, मका हबची उभारणी बीओटी तत्त्वावर केली जाणार आहे. एकीकडे ५० एकर जागेला संरक्षण देण्यासाठी भिंत उभारण्यात येत आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे मका हबसाठी बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी कन्सल्टंट कंपनीची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. हेच कन्सल्टंट मका हबमध्ये काय सुविधा असाव्यात याचा संपूर्ण प्लॅन तयार करून देतील. यानंतर मका हब उभारणीच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया शासकीय स्तरावर सुरू होईल.