मुख्य रस्त्याचा श्वास गुदमरला
By Admin | Updated: June 25, 2014 00:35 IST2014-06-25T00:06:20+5:302014-06-25T00:35:20+5:30
मोहन बोराडे, सेलू मुख्य रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे, हातगाड्यांंची बेशिस्त यामुळे शहरातील बसस्थानक - रेल्वेस्थानक या मुख्य रस्त्याचा श्वास गुदमरला आहे.
मुख्य रस्त्याचा श्वास गुदमरला
मोहन बोराडे, सेलू
मुख्य रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे, हातगाड्यांंची बेशिस्त यामुळे शहरातील बसस्थानक - रेल्वेस्थानक या मुख्य रस्त्याचा श्वास गुदमरला आहे. रायगड कॉर्नर ते रेल्वेस्थानक हा शहराचा मुख्य रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कच्ची व पक्की अतिक्रमणे करण्यात आल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी प्रचंड वाहतुकीच्या कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. अनेक वेळा या रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते.
या मुख्य रस्त्यावर बसस्थानक व रेल्वेस्थानक असल्यामुळे वाहनांसह प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. रेल्वेस्थानकावर तर रात्रीच्या वेळी रेल्वेगाडी आल्यानंतर प्रवाशांना बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच असतानाही कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. सायंकाळच्या वेळी अतिक्रणधारक रस्त्यावरच दुकान थाटतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होतेच शिवाय प्रवाशांना चालणे देखील अवघड झाले आहे. हिच अवस्था बसस्थानकाजवळील पहावयास मिळत आहे. अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता त्यातच अवैध वाहतुकीची वाहने तसेच हातगाडे रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे छोटे - मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. शहराचा हा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. सध्या बीओटी तत्वावर बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु अतिक्रमणामुळे बसस्थानक देखील दिसेनासे झाले आहे.
बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात अतिक्रमणे वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांनाही अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
सा.बां. विभागाला जाग येईना
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. कार्यालयालाच अतिक्रमणाचा विळखा पडला असतानाही सा. बां. विभाग मूग गिळून गप्प आहे. शहरातील इतर रस्ते सुसज्ज पालिकेने केले आहेत. मात्र हा रस्ता सा.बां. विभागाचा असल्यामुळे लक्ष घालण्यास कोणीही तयार नाही. अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे हे प्रकार घडत आहेत.
अपघाताची शक्यता
वाढलेल्या अतिक्रमणामुळे मुख्य रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीची वाहनेही बेशिस्तपणे चालविल्या जात असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहरातील आदर्शनगर कॉर्नरलाही ही वाहने उभी केली जातात. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. याच रस्त्यावरून शाळेकडे विद्यार्थ्यांना जावे लागते.