महावितरणचे वरिष्ठ अभियंता सरग आणि सिकनीस यांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:28 IST2019-01-22T19:14:41+5:302019-01-22T19:28:29+5:30
थकबाकीदार ग्राहकांची वीज चोरी रोखण्यात हे दोन्ही अधिकारी अपयशी ठरल्याचा ठपका

महावितरणचे वरिष्ठ अभियंता सरग आणि सिकनीस यांची उचलबांगडी
औरंगाबाद : महावितरणच्या कामांमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे शहर विभागाचे अधीक्षक अभियंता संजय सरग तसेच कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस या दोघांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.
प्रामुख्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या थकबाकीदार ग्राहकांची वीज चोरी रोखण्यात हे दोन्ही अधिकारी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी ही धाडसी कारवाई केली. यामुळे महावितरणमध्ये कार्यरत अभियंत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल मंगळवारी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी शहरातील एका हॉटेलमधील वीज चोरी पकडली. दीड लाख रुपयांचे वीजबिल थकलेले असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्या हॉटेलचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता; परंतु काल अचानक बकोरिया यांनी सदरील हॉटेलमध्ये वीज चोरी पकडली. यासोबतच महावितरणच्या विविध मोहिमांमधील शहरातील कामगिरी याची माहिती घेतली असता ती समाधानकार नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या सहव्यवस्थापकीय संचालक बकोरिया यांनी शहर विभागाचे अधीक्षक अभियंता संजय सरग व शहर विभाग क्रमांक-१ चे कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस या दोघांची तडकाफडकी उचलबांगडी करण्याचा धाडसी निर्णय घेतला.