महावितरण, ग्रा.पं.वर हल्लाबोल
By Admin | Updated: June 5, 2014 01:09 IST2014-06-05T00:56:14+5:302014-06-05T01:09:03+5:30
दौलताबाद : वाढता उकाडा आणि त्यातही १२ ते १३ तास भारनियमन यामुळे संतप्त झालेल्या दौलताबादकरांनी येथे महावितरण व ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून जाळपोळ केली.
महावितरण, ग्रा.पं.वर हल्लाबोल
दौलताबाद : वाढता उकाडा आणि त्यातही १२ ते १३ तास भारनियमन यामुळे संतप्त झालेल्या दौलताबादकरांनी येथे महावितरण व ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून जाळपोळ केली. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांना गजाआड केले आहे. दौलताबाद येथे दररोज तसे आठ तास भारनियमन होते; पण आता ते १२ तास करण्यात येत आहे. वाढत्या उन्हाळ्यासोबतच असह्य उकाडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर भारनियमन कमी न होता ते वाढविण्यात आल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट होऊन ही घटना घडली. भारनियमनाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास नागरिक महावितरणच्या कार्यालयासमोर जमू लागले. थोड्याच वेळात त्याचे रूपांतर मोठ्या जमावात झाले. पाहता पाहता हा जमाव बेफाम झाला. प्रथम या जमावाने महावितरणच्या कार्यालयावर हल्ला करीत दरवाजे तोडून तेथील टेबल, खुर्च्या, संगणक यांची तोडफोड करून महत्त्वाची कागदपत्रे जाळली. त्यानंतर जमावाने आपला मोर्चा शेजारीच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे वळविला. ग्रामपंचायत कार्यालयातील टेबल, खुर्च्या, संगणक आणि कागदपत्रे यांची जाळपोळ केली. या प्रकारात ग्रामपंचायतीचे अंदाजे १ लाख ११ हजार रुपयांचे, तर महावितरण कार्यालयाचे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गौतम फसले, उपनिरीक्षक गजानन तडसे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कारवाई करून २१ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला. सर्व आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. १ जून रोजी झाले होते आंदोलन भारनियमनाच्या निषेधार्थ यापूर्वीही १ जून रोजी काही युवकांनी रास्ता रोको करून या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हे आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. (वार्ताहर)