इतिहासाच्या पुनर्मांडणीत महात्मा फुलेंचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:04 IST2021-04-12T04:04:27+5:302021-04-12T04:04:27+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळीची पायाभरणी महात्मा जोतिराव फुले यांनी केली. एवढेच नव्हे तर भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीतदेखील त्यांचे मोठे ...

इतिहासाच्या पुनर्मांडणीत महात्मा फुलेंचे योगदान
औरंगाबाद : महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळीची पायाभरणी महात्मा जोतिराव फुले यांनी केली. एवढेच नव्हे तर भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीतदेखील त्यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन आजीवन शिक्षण विभागाचे संचालक संजय मून यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले प्रतिष्ठान अध्यासन केंद्राच्या वतीने रविवारी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास संचालक डॉ. वीणा हुंबे यांच्यासह प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी दोन व्याख्याने झाली. आजीवन शिक्षण विभागाचे संचालक डॉ. संजय मून यांचे ‘भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीचे भाष्यकार : महात्मा फुले’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, महात्मा फुले यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीची बिजे रोवली. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात हा वारसा नेटाने पुढे नेला, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांना गुरु मानून संपूर्ण जीवन वंचितांसाठी वेचले. विशेषतः तत्कालीन समाज रूढी, परंपरांच्या जोखडात अडकलेला असताना त्याला यातून बाहेर काढण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. इतिहासाच्या पुनर्मांडणीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असे ते म्हणाले.
पर्यटन प्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश रगडे म्हणाले की, ‘फुले, आंबेडकर आणि आम्ही’ या विषयावर भाष्य केले. महाराष्ट्राच्या मातीत परिवर्तनाचा अंगार पेटवणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आपण कृतीत आणले तरच खऱ्या अर्थाने त्यांचे स्वप्न साकार होईल. या व्याख्यानांच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ. शाम शिरसाट होते. छत्रपती शिवरायांच्या समाधीचा घेतलेला शोध व शिवरायांवरील पहिला पोवाडा लिहिण्याचे मोठे काम महात्मा फुले यांनी केले, असे डॉ. सिरसाट म्हणाले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासन केंद्राच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रास्ताविकात डॉ. वीणा हुंबे यांनी सांगितले. या कार्यक्रमात कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, अधिसभा सदस्य डॉ. सतीश दांडगे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी सहभागी झाले होते.